कष्ट म्हणजे काय असते आणि कष्टावरती काय मिळविता येते हे फक्त साळुंके परिवार सांगू शकतो..!
कष्ट तर अनेकजण करतात आणि कष्टातच संपतात. पण विचारपूर्वक आणि सातत्य राखल्यानंतर यश कसे मिळवता येते मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पोथरे येथील साळुंके परिवाराचे देता येईल. अंकुशनाना साळुंके व त्यांचे बंधू कै. कांतीलाल साळुंके या दोघा बंधूनी मेहनत आणि भविष्यातील स्वप्नं पाहत परिवाराची मिळालेली शेती आदर्श करत उत्पन्न मिळवलेच पण त्याबरोबर परिवार सुसंस्कृत करण्याच्या दृष्टीने त्यांनी मोठे यश मिळवले आहे.
पोथरे (ता करमाळा) येथे साळुंके परिवार हा अतिशय शांत आणि संयमी परिवार म्हणून ओळखला जातो. कोणाच्याही भानगडीत न पडता आपले काम भले आणि आपण भले असे म्हणत या परिवाराने गावातील अनेकांशी स्नेहाचे संबंध जोडले आहेत. अंकुश साळुंके आणि कांतीलाल साळुंके हे दोन बंधू राम लक्ष्मणासारखे होते. दुर्दैवाने सन २००२ मध्ये कांतीलाल साळुंके यांचे विहिरीत काम करताना अपघाती निधन झाले. त्यानंतर अंकुशनाना साळुंके यांच्यावरती सर्व परिवाराची जबाबदारी पडली. त्यांनीही अतिशय समर्थपणे ही जबाबदारी पार पाडली. भावाच्या निधनानंतरही पाच वर्षे एकत्र राहून पुतण्या किरण कांतीलाल साळुंके हा स्वत:च्या पायावर मजबूत उभा राहिल्यानंतर त्यांच्यात विभागणी झाली.
साळुंके परिवाराने वडिलार्जित मिळकतीत कष्ट आणि प्रयत्नाच्या जोरावर आणखीन २२ एकर मिळकत विकत घेतली आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले आहेत. ऊस, लिंबोणी, डाळींब, पपई, अशी वेगवेगळी पिके तर घेतलीच पण जोडीला दूध व्यवसाय, शेळीपालन, कुकूटपालन हेही व्यवसाय केले. सोबत ट्रॅक्टर असल्याने काही वर्षे ऊस टोळी मजुराच्या सहाय्याने कारखान्याला ऊस पुरविण्याचे कामही त्यांनी केले आहे. एवढेच नाहीतर दूध डेअरीचा व्यवसायही त्यांनी करून प्रगतीत एक पाऊल पुढे टाकले. शेतीतील आवश्यक असणारी सर्व अवजारे त्यांच्याकडे असून असून येणाऱ्या गरजू माणसाला ते कायम मदत करत असतात.
स्वत:च्या प्रगतीबरोबरच इतरांना जिथे आवश्यक असेल तिथे ते मदतीचा हात देतात. धान्य असो नाहीतर वस्तू असो नाहीतर शारिरीक श्रम असो. कधीही ते मागे घेत नाहीत. अंकुशनाना साळुंके यांची मुले विलास व अमोल तसेच पुतण्या किरण हे सर्व राजकारण विरहित सामाजिक कार्यात सहभागी असतात. या बाबीमुळे या परिवाराने ग्रामस्थांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.
कोरोनाच्या धक्क्यानंतरही साळुंके परिवार स्थिर..!
या कोरोनाच्या कालावधीत अंकुशनाना साळुंके या परिवारावर मोठे संकट आले. ११ जणापैकी ९ जण रूग्णालयात दाखल होते. जवळपास १३ ते १४ लाख रूपये दवाखान्याला गेले. परमेश्वराच्या कृपेने सर्वजण सुरक्षित राहिले. ही बाब महत्वाची आहे. परिवारातील सौ. सुनंदा अंकुश साळुंके मुले विलास अंकुश साळुंके, अमोल अंकुश साळुंके, सुना वैष्णवी विलास साळुंके, प्रियंका अमोल साळुंके, नातवंडे विराज विलास साळुंके, प्रतिक अमोल साळुंके, आरती अमोल साळुंके हे सर्वजण एका विचाराने कार्यरत असून घरातील सर्व काम मोठ्या ताकदीने करत असल्याने घर एकसंघ आहे. त्यामुळे घराची प्रगती आहे. आता अंकुशनाना यांचे नातवंडे कुस्तीपासून संगणकाचे शिक्षण घेतात. त्याचबरोबर करमाळा येथील माध्यमिक विद्यालयात उत्तमप्रकारे शिक्षण घेत आहेत. एकंदरीत कष्टाच्या जोरावर कसे उभे रहावे व माणसे कशी जोडावी हे साळुंके परिवाराकडून शिकण्यासारखे आहे.