सौंदर्याचा रंग कोणता?

इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे लिखित सौंदर्याचा रंग कोणता हे पुस्तक माझे हाती लागले पुस्तकाचं कव्हर काळसर रंगात विठ्ठलाची मूर्ती असणारं दिसलं पुस्तकाचे कव्हर पाहूनच माझी वाचन करण्याची इच्छा झाली . अलीकडे मोबाईल मुळे वाचन करण्याची वृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी झाली आहे परंतु पुस्तकावरील सौंदर्याचा रंग आणि मुखपृष्ठावर सावळ्या विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यानंतर मला खात्री पटली की सौंदर्याचा रंग हा सावळाच असेल . माझ्या मनामध्ये मी स्वतः सावळा असल्यामुळे अनेक न्यूनगंड आहेत माझ्या कपड्यावरून बरेचसे मित्र म्हणतात “तुझ्या रंगाला हे शोभत नाही तू अशी कपडे घालू नको” परंतु जे गोरे गोमटे आहेत त्यांनी मात्र कोणत्याही प्रकारची कपडे घातली तर त्यांना कोणीही बोलत नाही उलट त्यांचे कौतुक केले जाते ही खंत माझ्या मनात असल्यामुळे मी हे पुस्तक आवडीने वाचण्यास घेतले आणि वाचून पूर्ण केले.
डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांची आजवर मी ऐतिहासिक पुस्तके बरीच वाचली आहेत परंतु हे पुस्तक मला अतिशय वेगळे वाटले या पुस्तकांमध्ये डॉक्टर कोकाटे यांनी मानवी उत्क्रांतीपासून मानवाची होत गेलेली प्रगती वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडले आहे मानवाचे रंग नाक कान डोळे हे हे प्रादेशिक भागातील वातावरणावर अवलंबून असतात याचे प्रत्येक देशातील व्यक्तीचे वर्णन करून सांगितले आहे तसेच प्रत्येक देशातील व्यक्तीची सौंदर्याची कल्पना वेगवेगळी आहे हे नमूद केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सावळा रंग आरोग्यासाठी कसा महत्त्वाचा आहे हे कॅन्सर सारख्या आजारांचे उदाहरण घेऊन व सावळी त्वचा असणाऱ्या लोकांची शारीरिक कार्यक्षमता उदाहरणासहित सरांनी मांडली आहे . समाजामध्ये अनेक व्यक्तींना आपण काळे आहोत नकटे आहोत याचा न्यूनगंड आहे तो दूर करण्यासाठी सरांनी अनेक उदाहरणे दिली आहेत म्हणजेच आपल्याला जे शरीर मिळाला आहे तेच खरे सर्वश्रेष्ठ आहे हे यातून घेण्याची गरज आहे. परंतु सध्या सौंदर्य म्हणजे गोरागोमटा लांब सरळ नाक सुंदर केस सडपातळ बांधा अशी मांडणी केली जाते त्यामुळे सौंदर्यप्रसाधने व आरोग्य शिबिरे मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचे काम करत आहेत.
पुस्तकावर सावळ्या विठ्ठलाचे चित्र असल्यामुळे प्रत्येकाला या पुस्तकांमध्ये विठ्ठलाची महती फक्त असेल असे वाटते परंतु तसे नसून समाजातील अनेक विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे त्यामध्ये भाषा सौंदर्य हा एक महत्त्वाचा विषय त्यांनी घेतला आहे प्रादेशिक विभागानुसार प्रत्येक ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या बोलीभाषा असतात आणि त्या बोली भाषेचे सौंदर्य ज्या त्या प्रदेशांमध्ये फार मोठे असते परंतु काही लोकांनी अलीकडे प्रमाण भाषा याची व्याख्या केल्यामुळे इतर प्रादेशिक भाषेवरती लिखाण करणाऱ्या लेखकास कमी लेखले जाते परंतु कोकाटे सरांनी प्रादेशिक भाषेचे सौंदर्य पटवून देऊन आपले विचार समाजापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्या त्या परिसरातील प्रादेशिक भाषा मध्येच लिखाण करावे व व्याकरण हे प्रमाण मानू नये असे थोर साहित्यिकांनी देखील म्हटलेला आहे.
नापास विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणाऱ्या मथळ्याखाली त्यांनी परीक्षेमध्ये कमी यश मिळणाऱ्या परंतु समाजामध्ये अतिउच्च पदावर पोहोचलेल्या अनेक व्यक्तींचे विकास कार्य लिहिले आहे ते सध्याच्या अपयश येणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अपयशातून यशाकडे कसे जाता येईल व त्यासाठी कसा प्रयत्न करता येईल ते आपल्याला कोकाटे सरांनी उदाहरणांसह सांगितले आहे. अशिक्षित असणारा शेतकरी देखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून लाखोचे उत्पादन काढतो त्याच्याकडे कोणतीही डिग्री नसती तेव्हा शिक्षणात अपयश आले म्हणून व्यक्तीने खचून न जाता प्रयत्नशील राहणे हे महत्त्वाचे आहे.
चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटातील व्यक्तिरेखा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे झोपडपट्टीत वावरणाऱ्या मुलांचे कौशल्य याचे सौंदर्य त्यांनी व्यक्त केले आहे. आदिवासी जमाती वरती असणारा जय भीम हा चित्रपट व त्यातील अविष्कार श्रीमंत कोकाटे सरांनी या पुस्तकात मांडला आहे काही जमाती वरती अजूनही चोरी करतात असा शिक्का मारला जातो आणि त्यांना विनाकारण वेठीस धरले जाते हे देखील यातून त्यांनी मांडले आहे.
मानव शाकाहारी की मांसाहारी याबद्दल कोणताही वाद न घालता मानवाने कोणता आहार घ्यायचा हे आपल्या आरोग्याचा विचार करून ठरवावे असा अर्थ व देणारे विवेचन कोकाटे सरांनी केली आहे . काही पंथामध्ये कांदा लसूण खात नाहीत परंतु मानवी आरोग्याला त्याचे फायदे काय आहेत हे वैज्ञानिक दृष्टीने त्यांनी पटवून दिले आहे . शाकाहारी व्यक्तींना शरीरातील अनेक घटकाची कमतरता भरून काढण्यासाठी ज्या मेडिसिन दिल्या जातात त्यामध्ये प्राण्यांच्या हाडांची भुकटी असते हे देखील सांगायला ते विसरले नाहीत.
आपल्या आरोग्यासाठी कोणता आहार महत्त्वाचा आहे ते प्रत्येक व्यक्तीने जाणून घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर शाकाहार करणारे उच्च आणि मांसाहार करणारे कनिष्ठ असे समाजामध्ये भेद करू नये असे त्यांनी नमूद केले आहे.
अनेक व्यक्तीची शारीरिक व्यंगावरती टिंगल टवाळी केली जाते त्यावरती देखील कोकाटे सरांनी अतिशय सविस्तर विवेचन केले आहे. सिनेमांमध्ये नायकाची भूमिका करणारे हे गोरे गोमटे घेतले जातात व खलनायक ही भूमिका करणारे शरीराने जाडजूड रंगाने काळे नाक बस्के असेच व्यक्ति घेतल्या जातात असा भेदभाव करू नये असे देखील त्यांनी मत व्यक्त केले आहे.
सर्व पुस्तक वाचल्यानंतर मला आपल्या मनावरती असणारा थोडाफार शरीरयष्टीचा न्यूनगंड दूर झाला. आजपर्यंत मला कोणीही विचारलं आपल्यापैकी सुंदर कोण तर मी त्यांना “मी स्वतःच आहे” असे उत्तर द्यायचो त्यावर सर्व मित्र हसायचे परंतु आज कोकाटे सरांचे पुस्तक वाचलं आणि मी जे मित्रांना उत्तर द्यायचं त्याचे खरे उत्तर मला आज मिळाले
एकूण 96 पानाचे हे पुस्तक एका बैठकीत वाचून होण्यासारखे आहे अक्षर जुळवणी देखील सुंदर आहे. प्रत्येक घटकाला अनुसरून त्यांचे विभाजन वेगवेगळ्या शीर्षकाखाली केले आहे प्रत्येक शीर्षकाखालील मजकूर हा वेगवेगळ्या आशयाचा असल्यामुळे प्रत्येकाला आवडेल त्या शीर्षकाखालील माहिती वाचणे सोपे जाते तेव्हा प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचून सौंदर्याची कल्पना जाणून घ्यावी.
✍️प्रा. धनंजय विठ्ठल पन्हाळकर, देवगड /नेरले, (ता.करमाळा) मो. 9423303768
