‘सत्यशोधक समाज’ – वारसा विचारांचा
२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जमीनदार , शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून त्यांच्या शारीरिक मानसिक शैक्षणिक आर्थिक सामाजिक अशा सर्वच गुलामगिरीतून ईथल्या मूलनिवासी दलित, बहुजनांची मुक्तता करणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
देवाविषयी किंवा सृष्टीच्या निर्माणकर्त्याविषयी निर्मिक हा शब्द त्यांनी वापरला. एकेश्वरवाद ईश्वर भक्ती यांचे त्यांनी समर्थन केले होते परंतु हे करत असताना ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी तसेच त्यामधे मध्यस्थाची अथवा भट भिक्षूकांची आवश्यकता नाही याचे प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केले त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ असावी याच स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिले. स्वर्ग-नर्क पुनर्जन्म अशा गोष्टींना महात्मा फुलेंनी थारा दिला नाही. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. मानवतावादी धर्मांची शिकवण देऊन महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा ठरवताना त्यांनी ईथल्या मूलनिवासी दलित उपेक्षित शोषित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.
सर्वसाक्षी जगत्पती ! त्यासी नकोच मध्यस्थी ! हे या समाजाचे ब्रीद वाक्य होते.सत्यशोधक समाजातर्फे दीनबंधू नावाचे साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. १८७७ साली स्थापन झालेल्या या साप्ताहिकाचे संपादक म्हणून कृष्णराव भालेकर हे काम पाहत असत कष्टकरी शेतमजूर, कामगार दलित यांच्या शोषणाच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडण्याचे काम होत असे.व पुढे हे मुंबई येथून नारायण मेघाजी लोखंडे या सहकाऱ्यांनी ते व्यवस्थितपणे चालवून समाज प्रबोधनाची चळवळ जिवंत ठेवली होती.महात्मा फुलेंनी धार्मिक कर्मकांड, तसेच लग्नामधे केला जाणारा वायफळ खर्च यांना फाटा देऊन पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणे, सत्याच्या अनेक बाजू अनेक पैलू लक्षात घेऊन बुद्धिवादी तर्क आणि विवेकनिष्ठ भूमिकेने सामुदायिक पातळीवरुन घ्यावयाचा म्हणून समाज हे पद त्यामधे समर्पक आहे.दलित बहुजन अशा सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी पहिली शाळा ही महात्मा फुले यांनी १८४८ साली पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केली होती त्यानंतर अजून बऱ्याच शाळा त्याकाळी सुरू करण्यात आल्या होत्या, ब्राह्मण मुस्लिम मराठा महार मांग चांभार ईत्यादी सर्व जाती धर्मातील मुल मुली तिथं शिक्षण घेत असत.
शिक्षणाअभावी मनुष्याची कशी दैन्यावस्था होते हे महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात नमूद केले कि, विद्येविना मति गेली !! मतिविना नीती गेली !!
नीतीविना गती गेली !! गतीविना वित्त गेले !! वित्ताविना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले अशा शब्दांत त्यांनी मार्मिकपणे म्हटले होते.
सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी देखील अथक परिश्रम केले होते त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून दिले होते.गिरणी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले, महात्मा फुले यांचे खंदे समर्थक नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिलहॅंड असोसिएशन स्थापन करुन फॅक्टरी आयोगाकडे कामगारांची बाजू मांडली त्यांच्या हक्कांबाबत सूचना केल्या. स्वातंत्र्य ,समता, बंधुत्व,यांचा पुरस्कार करुन एक नवा समाज घडविणे हे त्यांचे प्रमुख कार्यापैकी एक कार्य होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यात त्यांना कृष्णराव भालेकर,नारायण मेघाजी लोखंडे, डॉ.विश्राम घोले, स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावरु, भास्करराव जाधव सदोबा गावडे असे असंख्य उत्तम सहकारी लाभले होते व पुढही ही चळवळ केशवराव जेधे दिनकरराव जवळकर इत्यादींनी ही क्रांतीची मशाल सतत तेवत ठेवली होती करवीरनगरी कोल्हापूर संस्थानात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा वारसा पुढे चालवून कोल्हापूरातही याची शाखा स्थापन करुन दलित उपेक्षित गरीब बहुजन समूहाला आपल्या राज्यात त्यांनी मोफत शिक्षणाची तरतूद तर केलीच तसेच रोजगार उपलब्ध करून आपल्या संस्थानात नोकऱ्याही देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे ते देखील पुढे सदस्यच होते अन्याय अत्याचार पुरोहितांची मक्तेदारी मोडीत काढून राजर्षी शाहू महाराजांनी मराठा व बहुजनांना त्यांचे हक्क अधिकार दिले.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही महात्मा फुले यांना गुरुस्थानी ठेवून समाज परिवर्तनाची,लोकशिक्षणाची अन्यायावर प्रहार करून समतेची ही चळवळ बुलंद केली.अशा या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५१ वर्ष पूर्ण झाली आहेत आजही समाजात अप्रत्यक्षरीत्या तसेच उघडपणे जातीवाद विषमता उच्च निच्च भेदभाव शोषण धार्मिक कर्मकांड असे प्रकार होताना दिसतात यासाठी आपल्या महाराष्ट्रातील तमाम बहुजन बांधवांनी खास करून तरुणांनी अशा गोष्टींचा विरोध करुन रोजगार शिक्षण तसेच समाज परिवर्तन करण्यासाठी सत्यशोधक समाजाचा वैचारिक वारसा जपून आपली एकजूट कायम राखण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे.