वर्तमानपत्रांचे मंतरलेले दिवस!
मला वर्तमानपत्राची आवड लागली तेंव्हा ‘वर्तमानपत्रं’ प्रचारप्रसार माध्यमसत्तेत अक्षरश: उंचीवर होती!
वर्तमानपत्र ज्याच्या घरी यायचे तो माणुस म्हणजे गावगाड्यातला ‘मान्यवर’ वाटायचा! श्री.सुदाम नाळे सर यांच्या वाड्यात बसुन कित्येकवेळा मी ‘सकाळ’ वाचुन काढायचो! करमाळा तालुक्यात ‘साप्ताहिक संदेशने’ निर्विवादपणे आपला डंका वाजवला होता!त्यात येणारी प्रत्येक बातमी ‘आपली बातमी’ वाटायची!साप्ताहिक संदेश म्हणजे आठवडाभराचं टाॅनिक असायचं!
गावात श्री.पंढरीनाथ गाडे हे सकाळशी जोडलेले पहिलं नाव!त्याच सकाळमध्ये आज श्री.आण्णा काळे प्रभावी काम करताना पाहताना कौतुक वाटतं!
मोहन मारकड,दुसरे आण्णा काळे,भिसे सर हि परिसरातील वार्ताहरांची आणखी काही नावे!
गावातील वाड्यावस्त्यांवर ‘सकाळची’आवृत्ती सायकलवर टाकताना श्री.नाना कांबळे यांना खुप दिवस पाहिले! पुढे कोर्टीला शाळेत जायला लागल्यानंतर बसस्टँण्डवर श्री.मेढें यांचा स्टाॅल जवळचा वाटायला लागला अन् करमाळ्यात बसस्टँण्डवर घोलपांचा स्टाॅल स्वागतालाच असायचा! त्यावेळी काल रात्री छापलेला वर्तमानपत्राचा सुगंध सकाळ ताजी करायचा! क्रिकेटमुळे वर्तमानपत्राचं शेवटचं पान खुप भावायचं! त्यातल्या ‘चिंटु’मुळे चारुहास पंडीत अन् प्रभाकर वाडेकर हि नावं तोंडपाठ झाली होती! आजचा दै.लोकसत्ता घ्यायला त्यावेळी भिती वाटायची…दै.लोकमतमुळे दर्डा हे नाव लवकरच माहित झालं होतं…दै.संचार मात्र मला सोलापुरच्या बाहेर कधी दिसलाच नाही! रविवारी बातम्यांपेक्षा वाचनिय सदर जास्त असायची त्यात आमचा ‘बालमित्र’ यायचा….! चित्र रंगवा,शब्दकोडी,सात फरक ओळखा अशा सदरांमध्ये हरऊन जायचो! उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये ‘काॅमिक्स’ सोबत यायचं!
थोडी समज वाढल्यानंतर राशीभविष्यदेखील अट्टहासाने वाचावं वाटायचं!
हळुहळु मग ‘वाचकांचा पत्रव्यवहार’मध्ये पत्र पाठवायला लागलो! ते जर छापुन आले तर आनंदाची जत्रा मनात भरायची! सोलापुरच्या वर्तमानपत्रात मोहिते पाटिल,सुशिलकुमार शिंदे,काडादी,आडम मास्तर,बबनदादा शिंदे,दिगंबरराव बागल,राजेंद्र राऊत,जयवंतराव जगताप,राजेंद्र राऊत,रावसाहेब पाटिल,आनंदराव देवकाते,भारत भालके,राजन पाटिल,मनोहर डोंगरे,दिलीप माने,दिपकआबा साळुंखे अशी राजकीय नावं कायम वाचण्यात येत राहायची!
महाराष्ट्र केसरीसारख्या स्पर्धांच्या सोबतच साखर कारखाण्यांच्या निवडणुकिंच्या सविस्तर निकालासाठी निव्वळ वर्तमानपत्रावर अवलंबुन राहावे लागायचे!लोक उत्सुकतेने पेपरची वाट पाहताना दिसायची.
अशोक कामटे यांची २६/११ च्या हल्यातील शहिद झाल्याची बातमी काॅलेजमध्ये वर्तमापत्रातुन वाचली तेंव्हा डोळे तराळुन आले होते हि वाचनामागची जाणीव होती! हळुहळु मोजक्या लोकांकडे दुरदर्शन आले,वर्तमानपत्र न मिळाल्यास ओरडणारी माणसं हळुहळु दुरदर्शनकडे ओढली गेली!मग ७ च्या बातम्या आल्या….पर्यायाने डिजीटल क्रांती झाली अन् २४ तास बातम्यांना समर्पीत चॅनेल आले!
त्यात हळुहळु एव्हढा प्रचंड बदल झाला कि,वर्तमानपत्र दुर कोठेतरी हरऊन गेली!सध्या वर्तमानपत्राचा साचा तोच कायम जरी असला तरी त्या भोवतीचं वलय मात्र विरुन गेलेय!गावागावात किती लोकांकडे पेपर येतो याचा आकडा सांगता न येण्यासारखा दिसतो!
टि.व्ही.इंटरनेट,मोबाईल यांनी देशोधडीला जाण्याची वेळ आली आहे! टिव्हीवर चघळुन चघळुन चोथा झालेल्या बातम्या दुसर्या दिवशीच्या पेपरमध्ये शिळ्या वाटायला लागतात!अग्रलेखांची जागा आता टिव्हीवर हमरीतुमरीने होणार्या परिसंवादाने घेतली आहे राजकारण, समाजकारण,क्रिडा,मनोरंजन,जाहिरात,निधनवार्ता,वाढदिवस,सल्ला,राशीभविष्य,बालजगत यांवर आता सोशल मिडीयाचा प्रचंड मोठा पगडा आहे! वर्तमानपत्रं छापणं देखील येत्या काळात जिकरीचं होऊन बसेल! पर्यायाने सक्षम व बहुरंगी वाचनसंस्कृती जोपासणारी एक कार्यशाळा हळुहळु नजरेआड होईल कि काय अशी भिती वाटते….ती निरंतर टिकायला हवी!! ✍️ महेंद्र बंडगर, करमाळा