दुष्काळाच्या पावलांसमोर आपली पावलं बदलली पाहिजेत!
१९७२ च्या दुष्काळानंतर अन्नधान्य कसे वाढवावे हे आपला शेतकरी शिकला. त्यातून प्रचंड अन्नधान्य निर्माण झाले. आज अन्नाचा प्रश्न नाही, प्रश्न फक्त पाण्याचा आहे. त्यामुळे या दुष्काळातून भविष्यात पाणी कमी पडणार नाही अशा योजना केल्या पाहिजेत. दुष्काळाने पावले टाकण्यास सुरवात केली असल्याने त्याला तोंड देण्यासाठी आपली पावलं बदलली पाहिजेत!
राज्य शासनाने राज्यातील १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात २४ तालुक्यात गंभीर तर १४ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात आपल्या करमाळा तालुक्याचा मध्यम स्वरूपाच्या दुष्काळात समावेश आहे. तालुक्यात सरासरी पावसाच्या तुलनेत जेव्हा २५ टक्के पेक्षा कमी व २० टक्के पेक्षा जास्त पाऊस पडतो तेंव्हा कृषी उत्पन्नावर परिणाम होतो. दुसरा निकष म्हणजे पेरणी ५० टक्केपेक्षा कमी होते त्या भागाला ‘दुष्काळी भाग’ म्हटले जाते. पाऊस कमी पडला की नदी, तलाव, धरणातील पाणी पातळी कमी होते. जमीनीतील ओलावा घटल्यामुळे कृषी उत्पादन घटते. दुष्काळ म्हणजे दुष्ट काळ, दुःखाचा काळ, अन्नाची कमतरता, शुध्द पाणी कमी, रोजगार कमी एवढेच नाहीतर व्यक्तीची सर्व बाबीची खरेदी करण्याची क्षमता कमी होते. करमाळा तालुक्यात दुष्काळाचा असर हळू हळू वाढणार आहे.
सध्या काही भागात प्यायचे पाणी तळाला गेले आहे. जनावरांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जोपर्यंत साखर कारखाने चालू आहेत, तो पर्यंत जनावरांना वाढे मिळेल नंतर काय..? असे असलेतरी या तालुक्याच्या बाबतीत एक म्हणावेसे वाटते. ‘नशीब देते व कर्म नेते’ अशी स्थिती झाली आहे. या तालुक्याला नशिबाचे वरदान खूप चांगले आहे. उत्तरेकडे सीना नदी व दक्षिणेकडे भीमा नदी आहे. विशेष म्हणजे दोन्ही नद्यावर दोन धरणे झालेली आहेत. भीमा नदीवर उजनी धरण झाले. ते पुणे व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले आहे. असे असलेतरी ज्यांच्या हद्दीत आहे अशा करमाळेकरांना मात्र त्याचा फारच थोडा लाभ होत आहे. पुरेशी वीज मिळत नाही, तालुक्यासाठी पाण्याचा राखीव साठा नाही. दुसऱ्या बाजूला सीना नदी असून त्यावर कोळगाव प्रकल्प उभारलेला आहे. पण त्याचाही लाभ करमाळेकरांना किती होत आहे..?
या भागात पाणी असूनही वीज नसल्यामुळे पीके तर सोडा परंतू जनावरांना सुध्दा प्यायला पाणी मिळत नाही. कोळगाव प्रकल्पाचे पाणी साठवण नियोजन योग्य होत नाही. कमी पाऊस झाला की हे धरण कोरडे रहाते. तालुक्यातील ११ छोटे व मध्यम प्रकल्पाचे तलावात जवळपास तळपातळीवर पाणी आहे. मांगी तलावात जे पाणी आहे, ते किमान प्यायला पाणी म्हणून तरी साठवणे गरजेचे आहे. थोडक्यात त्यात तातडीने कुकडीतून पिण्यासाठी पाणी आणणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत तालुक्यात आदिनाथ, मकाई, भैरवनाथ, कमलाई हे चार कारखाने आहेत. त्यात मकाई सुरूच झाला नाही, आदिनाथ सुरू झाला पण ऊसाअभावी बंद आहे. भैरवनाथ व कमलाई हे कारखाने नेटाने चालवले जात असलेतरी या कारखान्यांना पुरेसा उस मिळेना; अशी स्थिती आहे.
करमाळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला आहे. दुष्काळ म्हटले, की शासन नागरीकांना रोजगार, अन्न, पिण्याला पाणी, जनावरांना चारा पुरवण्याच्या अनुषंगाने योजना राबवते व तातडीने मदतीचे नियोजन करते. या जाहीर झालेल्या दुष्काळात चारा छावणीचे नियोजन नाही, आवश्यक तिथे टँकर सुविधा देण्याचे नियोजन आहे. करमाळा शहरात अजून दुष्काळाची तीव्रता दिसत नाही; पण खेड्यात गेल्यानंतर दुष्काळाचे चटके काय असतात, हे लगेच समजतात. या दुष्काळाचा फटका पाळीव प्राण्याला बसतोच पण सर्वात जास्त वन्य प्राण्यांना मोठा फटका बसतो. अनेक प्राणी चारा व पाण्यावाचून मरतात. रोजगार हमीचे काम सन्मानपूर्वक दिले पाहिजे, तशी व्यवस्था येथे नाही. तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील आहे, प्रयत्नवादी आहे. याच मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील शेकडो एकरातील फळबागा शेवटच्या घटका मोजत आहे. त्यासाठी कोणतेच नियोजन नाही. अशा स्थितीत तालुक्यातील सर्वच पक्षाच्या, गटाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले पाहिजे व सर्वांना मदत केली पाहिजे. जर अशा प्रसंगी आपण आपली जबाबदारी पाळली नाहीतर आपण कोणत्या लायकीचे हे ज्याचे त्याने समजून घेतले पाहिजे. आपल्या तालुक्यात कृतीपेक्षा श्रेय लाटण्याचे मोठे युध्द कायम असते. एकमेकावर शिंतोडे उडवण्यामुळे कोणी श्रेष्ठ ठरत नाही. जो सर्वसामान्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो, विशेषतः जो यशस्वी ठरतो तो जनसामान्यांच्या स्मरणात राहतो. वास्तविक पाहता ‘मणभर आश्वासनापेक्षा कणभर मदत’ महत्वाची असते.
तालुक्यामध्ये दुष्काळाला प्रारंभ झाला पण कोणी दुष्काळी दौरा काढला आहे का..? तसे नियोजन तरी आहे का..? ही बाब महत्वाची आहे. संकटामध्ये सर्वसामान्यांचे आश्रू पुसले पाहिजेत. पण केवळ आश्रू पुसूनच थांबून चालणार नाही तर दुष्काळाने शेतकरी दबणार नाही, यासाठी आधार देण्याची गरज आहे. या संकटात तो उभा कसा राहील, त्याच्या पायात बळ कसे येईल, त्याला जगावेसे कसे वाटेल; यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बऱ्याचवेळा दुष्काळी दौरा काढत राजकीय गप्पा मारून समोरच्याला किळस वाटेल असे कृत्य केले जाते ते या काळात अपेक्षीत नाही. कारण आज लोकांना राजकारणात मागे काय झाले व पुढे काय करू यात रस नाही. आज तुम्ही काय केले आहे व काय करत आहात, काय मदत देणार आहात ही बाब महत्वाची आहे. आरोप-प्रत्यारोपापेक्षा ठोस व ठाम कृती व जनजागरण ही बाब महत्वाची आहे. दुष्काळ म्हणजे कमी पाऊस पडणे नव्हे, दुष्काळ म्हणजे हलाखी, जमीनीला भेगा नव्हे, पाण्याच्या रिकाम्या हंड्याच्या रांगा नव्हे, तर सर्वांनाच आज समजावून सांगायला हवे.. “बाबा दुष्काळ हा पाण्याचा गैरवापर व त्यातून निर्माण झालेली चणचण
आहे. आपल्याकडे जेंव्हा पाणी होते तेंव्हा व आजही आहे त्याचे योग्य नियोजन करत नाही. पाण्याचा अपव्यय करतो त्याचे फळ म्हणजे दुष्काळ आहे. जमीनीवरून पाणी देणे, ऊसाचे कटच्या कट अंदाजाने भिजवणे, पीकांना बेसुमार पाणी देणे ही दुष्काळाच्या आमंत्रणाची कारणं आहेत. पाण्याचे संरक्षण कधी केलेच नाही. पैशाची साठवण करतो, धान्यांची साठवण करतो, कडब्याच्या गंजी साठवतो पण पाण्याची बँक कोठे आहे ? शेततळी केली पण त्यात पाणी साठवून ठेवले नाही. पाझर तलाव केले पण त्यात पाणी साठवून दिले नाही. मोठ मोठे तलाव केले पण त्यातच सिमेंट बंधारे, नालाबंडींग केले. तलावात पाणी येण्याचे मार्ग आडवले. जे पाणी आडले ते भरमसाठ उपसले व वारेमाप उडवले. कमी पाण्याच्या पीकाचा कधी विचार केला नाही. विज्ञानाचा पाणी साठवण्यासाठी जो उपयोग व्हायला पाहिजे तसा उपयोग झाला नाही. पाणी पुर्नभरणाचे प्रयोग, विहीर, बोअर पुर्नभरण करण्यावर कोणी भर दिला नाही. पाणी कमी पडले की घे बोअर ! साडे-घोटी येथे जमीनीची बोअर घेऊन चाळण केली आहे. या दोन गावात दहा हजार बोअर आहेत. सर्वात खोल बोअर घेतले पण जमीनीत पाणी साठवण्यासाठी प्रयोग केले नाहीत. निसर्ग कसा साथ देणार..?
आज इंधनाच्या, मोबाईल चार्जेसच्या किंमती वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल, मोबाईल याची बचत कशी करता येईल. अनावश्यक वापर होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजही फटाके फुटले जातात, मोठमोठे लग्न समारंभ, अनावश्यक जेवणावळी, मद्यपा, नको त्या देवाला बोकड कापण्याचे प्रकार होतात. निदान या दुष्काळात तरी या बाबीला फाटा देण्याची गरज आहे. दुष्काळ हे संकट आहे, पण या संकटातूनच माणूस उभा राहायला शिकतो. १९७२ च्या दुष्काळानंतर अन्नधान्य कसे वाढवावे हे आपला शेतकरी शिकला. त्यातून प्रचंड अन्नधान्य निर्माण झाले. आज अन्नांचा प्रश्न नाही, प्रश्न फक्त पाण्याचा आहे. त्यामुळे या दुष्काळातून भविष्यात पाणी कमी पडणार नाही अशा योजना केल्या पाहिजेत. रोजगार हमीतून जिथे जिथे पाणी साठले जाईल; अशी ठिकाणे असतील त्या शेतकऱ्याच्या शेतात जलसंधारणाची कामे सुरू केली पाहिजेत.
पुर्वीच्या जलसंधारण कामात ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्या त्रुटी पुर्ण केल्या पाहिजेत. तालुक्यात हजारो नालाबंडीग व पाझर तलाव आहेत परंतू त्यात त्रुटी आहेत. कोठे सांडवा नाही, कोठे बांध पुर्ण नाही, कोठे भराव फुटला आहे. अपुरे सिंमेट बंधारे, फुटलेले सिमेंट बंधारे अशा कामात पैसे गेले. पण काम अपुर्ण असल्यामुळे त्याचा फायदा काहीच झाला नाही. पुर्वीची कामे परिपुर्ण केलीतर भविष्यात दुष्काळावर नक्की मात करू शकू.
आज दुष्काळातही जो भ्रष्टाचार करत असेल त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मटका, जुगार, एन्ट्री पुर्णपणे बंद केले पाहिजे. साध्या साध्या कामात सर्वसामान्याकडून लाच घेऊन त्यांना त्रस्त करणे थांबवले पाहिजे. मध्यंतरी चारा डेपो कंत्राटदारांनी शासनाकडून सात रुपये किलो प्रमाणे ठेका घेतला व चारा शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त तीन रूपये किलो घेतला. एका किलोला चार रूपये नफा ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. या सर्व बाबी सर्वांनी नीट पाहिल्या पाहिजेत, तरच या कठीण प्रसंगावर आपण मात करू शकू…!
✍️डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जिल्हा सोलापूर मो.९४२३३३७४८०