सहा एकरात केळीचे 27 लाखांचे उत्पन्न – करमाळा तालुक्यातील रणसिंग परिवाराचा प्रयोग
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.29 : ऊसाला पर्याय म्हणून केळी पीकाकडे पाहिले जाते पण शास्त्रोक्त पध्दतीने केळी केली व भाव चांगला मिळाला तर केळी, द्राक्ष हे ऊस पीकाला पर्याय ठरत आहे. हे खातगाव ( ता.करमाळा) येथील रणसिंग परिवाराने सिध्द केले आहे. यावर्षी तीन एकर खोडवा व तीन एकर नवीन केळीपासून तब्बल 27 लाख रूपये चे उत्पन्न मिळवले आहे.
खातगाव येथील शेतकरी व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टाकळी शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र रणसिंग यांनी गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. ते शेतात वेगवेगळी पीके घेऊन वेगवेगळे प्रयोग करत आहेत. ऊसाच्या वेगवेगळ्या जाती लावून त्यात ते विक्रमी उत्पादन घेतात.
मका, कांदा यातही ते यशस्वी झाले आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी दोडक्याचा प्लॉट केला होता. त्यातही ते यशस्वी झाले होते. त्याला अनेक शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. तीन वर्षापासून पैशाचे पीक म्हणून ते केळीकडे पाहत आहेत. गेल्या वर्षी केळीला मागणी नव्हती तरीही त्यांनी नवीन लागण करून केळीचे विक्रमी उत्पन्न घेतले होते. गेल्या वर्षी पाच ते आठ रुपये पर्यंत जाणारी केळी यावर्षी खोडव्याची केळी 17 ते 18 रुपया किलोपर्यंत गेली तर नवीन लागवड केलेली केळी 21 रुपयापासून 27 रुपयापर्यंत किलो असा विक्रमी भाव मिळाला. त्यांनी त्यांच्या शेतात तीन एकर खोडवा व तीन एकर नवीन लागवड असे केळीचे पीक घेतले होते.
त्यांना त्यातून जवळपास 27 लाख रुपयेचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी त्यांना एकंदरीत साडेतीन ते पावणे चार लाख रुपये खर्च झाला असे असे श्री. राजेंद्र रणसिंग यांनी सांगितले .शेतीतून कायम उत्पन्न पाहिजे असल्यास पीकात सातत्य ठेवले पाहिजे. त्यातून उत्पन्न मिळाल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडील शेतकरी एकच एक पिक घेत असल्यामुळे शेतात उत्पन्न मिळत नाही. आज बऱ्याच भागातून विशेषतः जिरायत भागातून ज्वारी पिक घेतले जात असत परंतु यावर्षी ज्वारीचे पीक बऱ्याच भागात घेतलेले नाही.
त्यामुळे ज्वारीला चांगली मागणी येऊन पैसे मिळणार आहेत. त्या धर्तीवर आम्ही आमच्या शेतात खोडवा ऊस गेल्यानंतर तीन एकरावर ज्वारी हे पीक घेतले आहे. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल. यावर्षी कांद्याला भाव नाही व कांद्याची बियाणे जास्त मागणी नाही त्यामुळे कांदा पीक बऱ्याच लोकांनी करण्याचे टाळले आहे परंतु यावर्षी रणसिंग यांनी त्यांच्या शेतात तीन एकर कांदा केला आहे तसेच ऊसाबरोबर यावर्षी दोन एकर पपई हे पीक घेतले आहे. याबाबत श्री.रणसिंग म्हणाले की वेगवेगळी पिके घेऊन त्या पिकाकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास व स्वतः शेतात कष्ट केल्यास शेती अतिशय चांगल्या पद्धतीने परवडते .पीकाला मिळणार्या भावाचा अंदाज घेऊन पिके केली तर निश्चितच शेतीतून उत्पन्न मिळते आणि शेती परवडणार नाही असे म्हणणाऱ्याला आळा बसल्याशिवाय राहणार नाही.