शिक्षक-कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी; शिक्षक भारती संघटना असणार पाठीशी - Saptahik Sandesh

शिक्षक-कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी; शिक्षक भारती संघटना असणार पाठीशी

केम (संजय जाधव) – शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षक भारती संघटना कायम पाठीशी असणार आहे. त्यामुळे  कोणत्याही प्रकारच्या आर्थिक-मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे तक्रार द्यावी, अशा कर्मचाऱ्याचे नाव देखील गोपनीय ठेवले जाईल अशी माहिती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

दिलेल्या प्रेसनोट म्हटले आहे की,  जिल्ह्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू आहे. या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कर्तव्याचे पालन प्रामाणिकपणे करत असतात. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नेहमी आदर्श समाज निर्मितीचे चित्र उभा करत असतो. स्वतंत्र भारताचा इतिहास सांगताना अन्याय विरुद्ध लढलेल्या, प्रसंगी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिक्षक सांगत असतात.

अलीकडच्या काळात शासनाच्या आर्थिक धोरणामुळे खाजगी संस्थांना शालेय कामकाज चालवण्यासाठी अनुदान मिळत नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील मुख्याध्यापक शाळा चालवण्यासाठी होणाऱ्या खर्चाची वसुली शिक्षकांकडून वर्गणीद्वारे करतात. अनेक वेळा शाळेसाठी भौतिक सुविधा निर्माण करताना होणारा मोठा खर्च शिक्षकांकडून घेतला जातो.



कर्मचाऱ्यांची पदोन्नती, विविध प्रकारच्या वेतनश्रेणीचे लाभ, वैद्यकीय देयके, थकीत देयके, फंडाची प्रकरणे, सेवानिवृत्ती नंतरचे निवृत्तीवेतन अशा व अनेक प्रकारच्या कामांसाठी त्यांची अडवणूक केली जाते. ही कामे पूर्ण करण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून आर्थिक मागणी केली जाते. केलेल्या मागणीस विरोध केल्यास कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जातो. कर्मचारी निमुटपणे हा मानसिक त्रास सहन करतो. स्वतःची कामे पूर्ण करून घेण्यासाठी मनाविरुद्ध आर्थिक तडजोडी करतो. हे सर्व करत असताना शिक्षकाच्या मनावर व आर्थिक परिस्थितीवर याचा वाईट परिणाम होतो आणि हा एक प्रकारचा त्या कर्मचाऱ्याचा छळ असतो. ही एक प्रकारची हिंसाच आहे.

अनेक शाळांमधील मुख्याध्यापक किंवा संस्थाचालक यांचेकडून कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते. कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जातो. बऱ्याच ठिकाणी न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात. यातून शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट थांबावी याकरिता मुख्याध्यापकांनी कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी अशाप्रकारे कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये विरोध करण्याची किंवा तक्रार करण्याची हिंमत नसते. अशा कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे मदत मागावी. संघटना त्यांच्या पाठीशी उभी आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध संघटना पूर्ण क्षमतेने काम करेल. शिक्षक भारती संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे जिल्ह्यातील कर्मचारी त्यांच्या शाळेत होणाऱ्या आर्थिक शोषणाविरुद्ध तक्रार देऊ शकतो. कर्मचाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. अशा आर्थिक वसुली करणाऱ्या, मानसिक त्रास देणाऱ्या शाळा प्रमुखांविरुद्ध संघटना योग्य ती भूमिका घेईल. जिल्ह्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी शिक्षक भारती संघटनेकडे मदत मागितल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

       आर्थिक शोषण व मानसिक त्रास या हिंसेला बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांना आधार देऊन त्यांच्या अडचणी सनदशीर मार्गाने व अहिंसेने सोडवल्यास खऱ्या अर्थाने बापूजींची जयंती साजरी होईल. राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करत असताना त्यांच्या विचारांप्रमाणे समाज घडवण्यासाठी शिक्षक भारती संघटना कटिबद्ध असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!