अयोग्य नियोजनामुळे उजनी 'मे' च्या पहिल्या आठवड्यातच मायनस मध्ये - जून मध्ये पाणी टंचाईची शक्यता - Saptahik Sandesh

अयोग्य नियोजनामुळे उजनी ‘मे’ च्या पहिल्या आठवड्यातच मायनस मध्ये – जून मध्ये पाणी टंचाईची शक्यता

सिध्देश्वर शिंदे, बेंबळे यांजकडून

करमाळा : उजनीच्या पाण्याचे गेल्या आठ महिन्यात योग्य नियोजन न केल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच उजनीने ‘मायनस’ (-उणे) पातळी गाठली आहे. मागील वर्षापेक्षा तब्बल 36 दिवस अगोदरच उजनीने ‘मायनस’ पाणी पातळी गाठली. गेल्या वर्षी 13 जून रोजी उजनी धरण मायनस मध्ये आले होते.काल(दि.६) सकाळी 11 वाजता घेतलेल्या माहीती नुसार 15 ऑक्टोबर 2022 ते 6 मे 2023 या कालावधीत सर्व पाणी वापर स्तोत्रांमधून 60 टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. तर 14 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात हरितक्रांती, धवल क्रांती, औद्योगिक तसेच कृषी औद्योगिक क्रांती घडवून आणणाऱ्या भाग्यवरदाईनी उजनी धरणातील पाणीसाठा सध्या पाणी पातळी 491.015 मीटर असून एकूण साठा 1799. 85 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 63.55 टीएमसी मृतसाठा (डेड स्टॉक) उपलब्ध आहे तर टक्केवारी ‘मायनस’ (-उणे) 00.012 टक्के अशी झालेली आहे.
धरण जलाशयातील पाणी पातळी 491.030 मीटर जाते तेव्हा 00.00 टक्के जिवंत पाणीसाठा असतो व त्याखालील पाणी साठा ‘मायनस’ मध्ये गणला जातो .15 ऑक्टोबर 22 रोजी उजनी जलाशयात 111.23 टक्के पाणी व १२३.२८ टीएमसी पाणीसाठा तयार झालेला होता. या एकूण साठ्यातील 63. 56 टीएमसी मृतसाठा तर 54.82 टीएमसी जिवंत पाणीसाठा असतो.

उजनी जलाशयातून 54 साखर कारखाने ,14 एमआयडीसी, चार मोठे सिनारर्माससारखे उद्योग, शेकडो पाणीपुरवठा योजना, वीज निर्मिती यंत्रणा, भीमा सीना जोड कालवा ,सीना-माढा व दहिगाव सारख्या मोठ्या सिंचन योजना व या व्यतिरिक्त हजारो शेतकऱ्यांच्या उचल पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे 7 लाख 50 हजार एकर लाभक्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी 3 हजार क्युसेक्स प्रवाही मुख्य कालवा २० किलोमीटर व पुढे उजवा कालवा 122 किलोमीटर तर डावा कालवा १२६ किलोमीटर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पसरलेला आहे.

सध्या उजनी कालव्यातून 3000 क्युसेक्स विसर्गाने पाणी चालू आहे, धरणाच्या भिंतीतील कालव्याच्या दरवाज्याची तळ पातळी 488 मीटर आहे व सध्या 491 मीटर पाणी पातळी अस्तित्वात असल्यामुळे कालवा दरवाज्यावर अद्याप तीन मीटर पाणी आहे व त्या मुळे कालव्यातून किमान 20 मे पर्यंत पाणी सुरू राहील तर भीमा सिना जोड कालवा (बोगदा) व उपसा सिंचन योजना 12 ते 15 मे पर्यंत चालू राहतील एवढी पाणी पातळी सध्या अस्तित्वात असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकंदरीत धरणातील पाण्याच्या सद्यस्थितीमुळे व मे अखेर किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात रोहिणी आणि मृग नक्षत्रांचा पाऊस पुरेशा प्रमाणात नाही पडला तर जून आणि जुलै मध्ये शेतीसाठी भीषण पाणीटंचाई जाणवेल.

उजनी धरण निर्मितीच्या वेळेस सोलापूर जिल्हा हा दुष्काळी रब्बीचा जिल्हा गृहीत धरून आठमाही पाणीपुरवठा धोरण अधिकृत समजून उजनी जलाशयात 63.56 एवढा प्रचंड मृत साठा गृहीत धरलेला आहे व म्हणून जलसंपदा लवादाच्या माहितीनुसार उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मृतसाठा राखीव असणारे एकमेव धरण आहे . यापुढे या मृतसाठ्यातील पाण्याचा वापर होणार आहे व याचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येतात व जलसंपदा विभाग केवळ मार्गदर्शक म्हणून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!