आजोबांची पेरणी तर नातवांचा बहर!... -

आजोबांची पेरणी तर नातवांचा बहर!…

0

“आजोबांनी आंब्याची झाडे लावावीत आणि त्याची गोड फळे नातवांनी चाखावीत,” ही आपल्याकडची जुनी म्हण केवळ शब्दांपुरती नाही, तर जीवनातील एक उघड सत्य सांगणारी बाब आहे. करमाळा शहरात या म्हणीचा  प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी कथा घडलेली आहे. ही कथा विश्वनाथ बाबुराव वीर उर्फ तात्या यांच्या आयुष्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या यशस्वी वाटचालीची आहे.

‘तात्या’ हे नाव करमाळ्यात केवळ एक बाॅन्डरायटर म्हणून प्रसिद्ध तर होतेच शिवाय,एक जिव्हाळ्याचा, विश्वासाचा आणि माणुसकी जपणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहिलेला त्यांचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरावा असाच आहे. सोलापूरचे प्रसिद्ध वकील एच.एस. शहा यांच्याकडे कारकून म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. त्या काळात ते केवळ कागदोपत्रीच काम शिकले नाही, तर लोकांच्या मनात स्थान कसे मिळवायचे हे ही शिकले. पुढे त्यांनी ‘बाॅन्डरायटर ’ म्हणून काम सुरु केले. खरेदी-विक्रीच्या माध्यमातून त्यांचे राजकर्ते आणि वकिलांशी चांगले संबध आले.

ऐवढेच नाहीतर या निमित्ताने त्यांचा संपूर्ण तालुक्यातील लोकांशी संपर्क वाढत गेला. पण हा संपर्क फक्त व्यवहारापुरता नव्हता; तो जिव्हाळ्याचा, विश्वासाचा आणि माणुसकीचा होता. गावागावातून येणारे कौटुंबिक वाद, भाऊबंदकीचे प्रश्न, नवरा-बायकोतील मतभेद — अशा अनेक गुंतागुंतीच्या समस्या लोक त्यांच्याकडे घेऊन येत असत.

‘तात्या’ त्या प्रत्येक प्रश्नाकडे संयमाने, समजुतीने पाहत आणि योग्य त्या वकिलांकडे ते प्रकरण सुपूर्द करत. विशेष म्हणजे, त्यांनी कधीही कोणत्याही वकिलाकडून मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही. निस्वार्थपणे लोकांना मदत करणे हीच त्यांची खरी ओळख होती. स्वतः वकील होऊ न शकल्याची एक हळवी खंत त्यांच्या मनात होती, पण त्यांनी ती खंत कधीच आपल्या कामाच्या आड येऊ दिली नाही.
मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा समाधानाचा क्षण पुढे त्यांच्या पुढील पिढीतून साकार झाला.

त्यांना नानासाहेब,कमलाकर आणि रमेश  ही तीन मुले. नानासाहेब लवकरच तात्यांच्या  बरोबर काम करु लागले. त्यांनी प्रयत्न व जिद्दीच्या जोरावर  विविध व्यवसायांतही यश मिळवले आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत केली.
दुसरे चिरंजीव कमलाकर यांना मुळतः फौजदार होण्याची इच्छा होती. पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच मार्ग ठरवला होता व तो तात्यांच्या मनातील सुप्त इच्छेचा होता.त्यांनी वकिली क्षेत्राची वाट निवडली आणि आपल्या कर्तृत्वाने, प्रामाणिकपणाने व अभ्यासू वृत्तीने एक सक्षम व नामवंत वकील म्हणून अल्पावधीतच नाव कमावले. ते केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता त्यांनी समाजकारण आणि राजकारणातही आपला ठसा उमटवला व तो कायम ठेवला आहे.रमेश यांनी आपले दोन्ही मोठ्या बंधुच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले.


तात्यांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये आणि वकिली क्षेत्राशी असलेले नाते ॲड.कमलाकर यांनी पुढे नेले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या पुढील पिढीलाही याच क्षेत्रात घडवण्याचे काम केले. त्यामुळे तात्यांच्या विचाराचा वारसा घेत नातू  ॲड.अक्षय कमलाकर वीर,ॲड.अजिंक्य कमलाकर वीर,ॲड.प्रितम नानासाहेब वीर , ॲड. किरण उध्दव( संजय) वीर व सून ॲड.सुजाता प्रवीण वीर व स्वत: ॲड. कमलाकर वीर असे आज वीर परिवारात तब्बल सहा वकील कार्यरत आहेत — एकाच कुटुंबातील सहा वकील ही अभिमानास्पद बाब आहे.

सर्वजण न्यायालय व इतर क्षेत्रात कार्यरत आहेत. ॲड. सुजाता वीर या पुणे येथील राज्य शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालयात विधी अधिकारी आहेत. सर्वजण आप-आपला ठसा उमटवत आहेत. पण या सर्वांच्या मुळाशी आहे ती तात्यांनी पेरलेली मूल्यांची बीजे.

ही कथा केवळ एका कुटुंबाच्या यशाची नाही; ती आहे एका व्यक्तीच्या निस्वार्थ सेवाभावाची, जिद्दीची आणि दूरदृष्टीची. तात्यांनी लावलेले झाड आज बहरले आहे — आणि त्या झाडाची फळे केवळ त्यांच्या  वीर कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला गोडवा देत आहेत.
खरंच, काही माणसं स्वतःसाठी जगत नाहीत; ती पुढच्या पिढ्यांसाठी वाट तयार करतात. विश्वनाथ बाबुराव वीर उर्फ तात्या हे त्यापैकीच एक — ज्यांनी पेरणी केली, आणि आज त्यांच्या नातवांनी त्या पेरणीचा बहर जगासमोर आणला.

✍️डाॅ. ॲड. बाबूराव हिरडे,करमाळा.मो.न 9011355389

Vishwanath Baburao  veer  Tatya| Ajinkya Veer, | Adv. Kamalakar veer | Adv. Pritam Veer | Adv. Kiran Veer | Adv. Sujata Veer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!