जातेगाव – टेंभुर्णी महामार्गावर अजून आपण किती जीव घेणार आहात? – NHAI ने तक्रारीवर दिले उत्तर

करमाळा (दि.२३) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561A वरील अहिल्यानगर ते जातेगावपर्यंतच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु जातेगाव–करमाळा- टेंभुर्णी या रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याने हा रस्ता कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाळवणी (ता. करमाळा) येथील श्रीकृष्ण शिंदे यांनी या मार्गावरील रखडलेल्या कामाबाबत चिंता व्यक्त करत आपले सरकार या पोर्टलवर तीव्र तक्रार नोंदवली होती.

शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्याचे काम दहा वर्षांपेक्षा जास्त दिवस रखडलेले आहे यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांना अपंगत्व आले आहे व यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत अजून आपण किती जीव घेणार आहात? आपण यावर लवकरात लवकर काम चालू करावे व होणारे अपघातांना पूर्णविराम द्यावा मला याबाबत कारवाईचा तपशील मिळावा असे तक्रारीत लिहिले होते.

या तक्रारीला प्रतिसाद देताना नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) कडून कळविण्यात आले आहे की, सदर महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून NHAI च्या अखत्यारीत वर्ग करण्यात आला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, भूसंपादन प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे.

महामार्गाच्या कामासाठी सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी मिळालेली असून, कंत्राटदारालाही काम सुरू करण्यासाठी LOA इश्यू करण्यात आले आहे. लवकरच कामास सुरुवात होईल आणि नियोजित वेळेत हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
सदर तक्रार शिंदे यांनी एप्रिल २०२५ मध्ये आपले सरकार या पोर्टलद्वारे केली होती तर त्याचे उत्तर जून २०२५ मध्ये त्यांना देण्यात आले आहे.

आठवड्यात किमान एक अपघात
अहिल्यानगर ते जातेगाव या रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. मात्र, पुढील जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम अद्याप प्रलंबित आहे. करमाळा ते टेंभुर्णी दरम्यान काही ठिकाणी पूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टरने अर्धवट केलेला चौपदरी रस्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जास्त होत नाही. परंतु जातेगाव ते करमाळा हा सुमारे १३ किलोमीटरचा रस्ता अजूनही दुपदरीच आहे.

त्यामुळे रस्त्यावर वाहनांची रांगच रांग लागत आहेत. गाड्यांना क्रॉस करणे अत्यंत कठीण जाते. अनेकांना लाईन मध्ये प्रवास करायला संयम नसतो. त्यामुळे ते गाडयांना क्रॉस करायला जातात. यात क्रॉस करताना अंदाज न आल्याने अनेक अपघात घडत आहेत. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर एका आठवड्यात किमान एक अपघात होत आहे. आजपर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे.


