करमाळा भुईकोट किल्ल्यावरील स्वच्छता मोहिम उत्स्फूर्तपणे संपन्न - Saptahik Sandesh

करमाळा भुईकोट किल्ल्यावरील स्वच्छता मोहिम उत्स्फूर्तपणे संपन्न

करमाळा (सुरज हिरडे) –  करमाळा शहराला एक ऐतिहासिक वारसा असून या शहराचा इतिहास जर जपायचा असेल तर आपल्याला येथील ऐतिहासिक स्थळांना जपायला हवे हा विचार घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपच्या वतीने रविवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी करमाळा येथील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ग्रुपची ही पहिलीच मोहीम असून यापुढे अजून वेगवेगळ्या मोहीम आखल्या जाणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त करमाळा तालुक्यातील नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले. या ग्रुपने ऐतिहासिक ठेवा जतवणुक करण्याची ज्योत पेटविली असून याची मशाल करण्याची गरज आहे.

काल (दि.८) झालेल्या या मोहिमेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईराणी यांच्या माहेरकडील वंशज तेजराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. याबरोबरच या मोहिमेसाठी ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपच्या सदस्यांसह करमाळा शहरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता. युवकांनी हातात फावडे, कोयता, कुऱ्हाड, पाट्या हातात घेऊन बुरुजावर उगवलेली छोटी-मोठी काटेरी झाडे झुडुपे तोडली. गवतावर औषध फवारणी करण्यात आली. वुडकटर मशिनच्या साहाय्याने बुरुजावर उगवलेली मोठी झाडे तोडली. फावड्याने स्वच्छता केली. याची व्हिडीओ बातमीत खाली दिलेली आहे.

१७२७ ते १७३० या दरम्यान निजाम सरदार राजेरावरंभा निंबाळकर यांनी करमाळा येथील भुईकोट किल्ला व कमलाभवानी मंदिर बांधले आहे. या भुईकोट किल्ल्याला २१ बुरूज आहेत. करमाळ्याचा हा किल्ला भुईकोट (सपाट जमिनीवर बांधलेला)  प्रकाराचा असल्याने सुरुवातीपासूनच या किल्ल्याच्या आत देखील लोकवस्ती होती व किल्ल्याबाहेर देखील. राजेशाही संपल्यानंतर हळूहळू या किल्ल्याची दुरावस्था व्हायला सुरुवात झाली. कालानुरूप किल्ल्याच्या बुरुजाला डागडुजी न केल्याने बुरुज ढासळू लागले. या किल्ल्याच्या आतील परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. करमाळा नगरपरिषदेसह अनेक नागरिकांनी ठिकठीकाणी जमेल तिथे अतिक्रमण करत बुरुजांच्या दगड-माती, लाकूड यांचा वापर घरे बांधण्यास केला.

या किल्ल्याच्या पुनर्जीवनासाठी करमाळा तालुक्यातील अनेक विचारी लोकांनी याआधी तळमळ व्यक्त केलेली आहे. विविध कार्यक्रमातून,भाषणातून किल्ल्याविषयी आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक पत्रकारांनी किल्ल्याच्या पुनर्जीवनासाठी आपल्याला लेखणीच्या माध्यमातून विविध वर्तमानपत्रातून आवाज उठवलेला आहे. परंतु चर्चेशिवाय यात काहीच साध्य झालेले नाही. याविषयी शासनाकडून ठोस निर्णय घेतल्याशिवाय या किल्ल्याचे पुनर्जीवन होणे शक्य नाही असेच दिसून येते. यासाठी नागरिकांनी एकत्र येणे, लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करणे या गोष्टींची गरज आहे. या किल्ल्याबरोबरच करमाळा शहरातील राजेरावरंभा निंबाळकर यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेली ऐतिहासिक बारव, सात विहीर व ऐतिहासिक ९६ पायऱ्यांची विहीर यांच्या जतवणुकीसाठी सर्वांनी असेच एकत्र आले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी या गोष्टींचा समावेश पुरातत्व खात्याकडे देण्यासाठी पाठपुरावा करायला हवा.

७ विहीरीचा ढासळलेला कठडा

करमाळा शहराच्या दक्षिण दिशेला असलेल्या सात विहिरीचे कठडे कमकुवत झाले असून एका बाजूचा कठडा ढासळलेला आहे. तसेच विहिरीवर एका कठड्याजवळील जमीन खचलेली आहे. या विहीरीची योग्य ती दुरुस्ती करून हा पुरातन ठेवा जपला पाहिजे. करमाळा नगर परिषदेकडून या विहिरीचा वापर सन 1902 पासून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी केला गेला आहे. ऐतिहासिक ९६ पायऱ्यांच्या विहीरच्या दगडामध्ये छोटी झाडे, गवत उगवून आले आहेत. विहिरीतील पाणी अस्वच्छ असून त्यात कचरा,शेवाळ साचलेलं आहे. करमाळा शहरातील ऐतिहासिक बारवेत देखील हीच समस्या आहे.

९६ पायऱ्यांची विहीरीत उगवलेली झुडुपे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!