कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी करमाळा तहसीलवतीने भव्य मेळाव्याचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) आज शुक्रवारी (दि.१९ जुलै) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कुंभेज फाटा येथील सुप्रीम मंगल कार्यालयात ‘कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मेळावा’ होणार आहे. हा मेळावा करमाळा तहसील कार्यालय व सकल मराठा समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यासाठी सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व सर्व महा ई सेवा केंद्र चालक यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मराठा समाजातील जास्तीत जास्त लोकांनी कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले आहे.

सदर प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे व अटी दिलेल्या आहेत –
- अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला
- अर्जदारांच्या वडिलांचा आणि आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
- सातबारा उतारा
- कुटुंबात कुणबी नोंद असल्याचा पुरावा
- कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीची वारस कुणबी संदर्भातील सर्व पुरावे
- कुणबी संदर्भातील सर्व पुरावे करमाळा तालुक्यातील असावेत
- प्रतिज्ञापत्र सादर केलेला व्यक्ती प्रत्यक्ष हजर असावा अशा अटी आहेत.

