सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे समस्येच्या गर्तेत – पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
करमाळा : सीना नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असल्याने हे तीनही बंधारे समस्येच्या गर्तेत अडकले आहेत. या बंधाऱ्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेलतर बंधाऱ्याची तातडीने दुरूस्ती करण्याची गरज आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे; अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सीना नदीकाठावरील शेतकऱ्याची शेती बागायत व्हावी, या उद्देशाने राज्यात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानूसार करमाळा तालुक्यात सर्वात प्रथम सन १९८८ साली पोटेगाव येथे कोल्हापूर पध्दतींच्या बंधाऱ्याच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. १ एप्रिल १९८८ ला तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री आण्णासाहेब मस्के यांच्या हस्ते व तत्कालीन आमदार कै. रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २५ लाख रूपये खर्चाच्या या बंधाऱ्याचा शुभारंभ झाला.
पुढे या बंधाऱ्याचे काम पूर्ण होईपर्यंत ५० लाख रूपये खर्च आला. या बंधाऱ्याच्या नियोजनानूसार पोटेगाव, पोथरे, बाळेवाडी, बिटरगाव (श्री) येथील शेतक-यांची १५०० एकर शेती ओलिताखाली येऊ शकते. परंतु बंधारा बांधल्यापासून त्या बंधाऱ्याची गळती कायम सुरू आहे. त्यामुळे हा बंधारा म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी स्थिती आहे. प्रत्येक वर्षी अनेकांची तक्रार जावूनही पाटबंधारे विभागामार्फत या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे हा बंधारा होऊन गेल्या ३२ वर्षात त्याचा लाभ शेतकऱ्यांना पाहिजे त्या स्वरूपात झाला नाही.
याचप्रकारे संगोबा येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा व पुल बांधण्याचा निश्चय करून शासनाने १२ जुलै १९९१ ला ८० लाख १३ हजार ६७० रूपये खर्चास मंजुरी दिली.
त्याचे काम १९९३ ला पूर्ण झाले. यासाठी प्रत्यक्षात १ कोटी २६ लाख ९० हजार रूपये खर्च झाला. या बंधाऱ्यावर निलज येथील २५० एकर, पोथरे येथील १०५० एकर, बोरगाव येथील ५५० एकर, पोटेगाव येथील ५० एकर व खांबेवाडी येथील २५० एकर क्षेत्र बागायत होवू शकते. असे असलेतरी प्रत्येकवर्षी या बंधाऱ्याची दारे टाकण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक ती डागडुजी होत नसल्याने या बंधाऱ्याचाही पाहिजे तसा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. तीच स्थिती तरटगाव बंधाऱ्याचीही आहे.
सीना नदीकाठावरील शेतकऱ्यांची शेती कायमस्वरूपी किंवा आठमाही बागायत होण्यासाठी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे अत्यंत उपयुक्त आहेत. या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी शासनाने लाखो रूपये खर्च केलेले आहेत. आज या बंधाऱ्याची किंमत करोडो रूपये आहे. असे असलेतरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीची नितांत गरज आहे. मे महिन्यात या बंधाऱ्याच्या दुरूस्तीची कामे केल्यास पावसाळ्या नंतर या बंधाऱ्यात पाणी आडवता येऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आमदार संजयमामा शिंदे यांनी हा प्रश्न लावून धरून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न व्हावा; अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.