आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने पोंधवडी येथे तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेपर्यंतचे तांत्रिक मार्गदर्शन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोंधवडी (ता.करमाळा) येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने मंडळ कृषी अधिकारी, केतुर व तालुका कृषी अधिकारी, करमाळा यांच्यामार्फत “हुरडा पार्टीचे” आयोजन करण्यात आले होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोंधवडी येथे हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. तालुका कृषि अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
याअंतर्गत महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने तालुक्यात महिनानिहाय विविध उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय, लागवड पद्धती ,गावांमध्ये सभा घेऊन सभेमध्ये पौष्टिक तृणाण्याबाबत चर्चा मार्गदर्शन, पौष्टिक तृणधान्य बाबत प्रशिक्षण, आहार तज्ञांची संवाद, विविध शाळेमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धाचे आयोजन प्रभात फेरी चे आयोजन इत्यादी माध्यमातून प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे. उमाकांत जाधव यांनी या कार्यक्रमांमध्ये पौष्टिक तृणधान्य म्हणजे काय त्यांच्या आहारातील महत्त्व या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, कोद्रा, कुटकी, सावा, राळा, वरई इत्यादी पिकांचा पौष्टिक तृणधान्यांमध्ये समावेश होतो. या पिकांचे आहारातील सामावेश अतिशय वेगाने कमी होत आहे. आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली अनेकांच्या आहाराच्या सवयीत बदल झालेले आहेत. पिझ्झा, बर्गर, बेकरी पदार्थ, चायनीज पदार्थ, इतर जंक फूड चा लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत आहारात जास्त प्रमाणात वापर वाढला आहे.
शहरापुरते मर्यादित असलेले याचे प्रमाण खेडेगावातीही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. ज्वारी, बाजरी,नाचणी, इत्यादि पौष्टिक तृण धान्याचे चे आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघ 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. जागतिक भरडधान्य उत्पन्नामध्ये 41 टक्के उत्पन्न भारतामध्ये होते. यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारातून होणे अत्यंत आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष च्या निमित्ताने जगाला या पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व समजले तर आपल्या भारतात उत्पादित होणाऱ्या या पिकांना जगभरातून मागणी वाढू शकते. तसेच मागणी वाढल्यामुळे भरडधान्य क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते.
पौष्टिक तृणधान्य पिकांची वैशिष्ट्ये म्हणजे ही अल्प पावसाच्या परिस्थितीत शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात वाढतात. यांपासून ॲलर्जीचा धोका नाही. या पिकांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर अल्प प्रमाणात होतो. पर्यायाने उत्पादन व्यय अल्प होऊन उत्पादनात वाढ होते. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून ती ‘पौष्टिक तृणधान्य (न्यूट्री-सिरियल्स)’ म्हणून ओळखली जातात आणि पचायला हलकी असतात. यामुळे भूमीतील नत्राचे प्रमाण वाढून भूमीचा पोत सुधारतो. ही धान्ये पक्ष्यांचे आवडते खाद्य असून जैवविविधता वाढते, तसेच यांपासून विविध पदार्थ तयार करून विकल्याने बचत गट स्वयंपूर्ण पूर्ण होऊ शकतात. हा कार्यक्रम प्रकाश नवनाथ पांढरकर यांच्या शेतामध्ये देण्यात आला कार्यक्रमासाठी पोंधवडी गावचे सरपंच मनोहर कोडलिंगे, ग्रामरोजगार सेवक महादेव भिसे, प्रगतशील शेतकरी नाना मत्रे, पप्पू बुधवते, भरत ननवरे इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.