प्रश्न ? दूधाचा!..
सध्या शेतकऱ्याच्या दुधाच्या भावाचा प्रश्न चर्चेत आहेत. संकटात दुध उत्पादकांनी केवळ दुध उत्पादीत करून चालणार नाहीतर दुधावर प्रक्रिया करण्याचे धोरण आखण्याची गरज आहे.
संदेशच्या अंकाचे गठ्ठे सकाळी सकाळीच म्हणजे पावणे सहा वाजता कार्यालयात घेऊन आलो होतो. त्यावेळी कार्यालयापासून काही अंतरावर एक दुध विकणारा एका केटलीतील दुध मापाने काढत होता व जवळ असलेल्या दुसऱ्या बाटलीत ओतत होता. विशेष म्हणजे त्या बाटलीत अगोदरच साधारणत: पावशेर पाणी ओतलेले होते, त्यात दुध ओतात होता. अंदाजे एक लिटर दुध झाले की तो दुसरी बाटली भरत होता. अशाप्रकारे त्याने आठ बाटल्या भरल्या. त्यानंतर तो दुधवाला लगबगीने निघाला. जाताना त्याने त्या बाटल्या वेगळ्या पिशवीत ठेवल्या होत्या. साधरणतः वळण मारून ५०० फुटावर गेला असेल नसेल तोपर्यंत दारात तो सायकलसह उभा होता व मोठ्याने म्हणाला दुध… एक ९ १० वर्षाची मुलगी आली, तीच्या हातात त्याने ती बाटली दिली. त्या मुलीच्या हातात दुधाची बाटली पडताच ती एकदम खुष झाली व बाटली घेऊन पळतच घरात गेली. बहुतेक ती दुधवाल्याची वाट पहात असावी. हा प्रसंग मी एकाला सांगितला, तो म्हणाला, ‘दुधवाल्याचे असेच असते. काही लोक दुधात पाणी टाकत नाही पण पाण्यात दुध टाकत असतात. बाटलीत अगोदरच पाणी ठेवतात, त्यात
धार काढतात. विशेष म्हणजे ग्राहकाच्या उपस्थितीत बिगरपाण्याचे दुध म्हणून ते दुध विकतात.’
याच अनुषंगाने व्हॉटस्अपवर नुकतीच एक चित्रफित पाहिली. त्यात रेल्वेस्टेशनचा चहावाला चहामध्ये केमीकल वापरून दुध तयार करून तेच दुध चहात वापरतो. याबाबत तो दुध कसे बनवले ते दाखवतो तसेच २० रूपयात पाच लिटर दुध तयार मिळत असेलतर जास्त पैसे कशाला खर्च करायचे..? अस्सल दुध वापरले तर मला काहीच परवडणार नाही; असा त्याचा युक्तीवाद आहे. या दुधाने ग्राहकाला काय त्रास होतो याचा तो अजिबात विचार करत नाही.
मध्यंतरी दुधाच्या पावडरबाबत अशाच चर्चा कानावर येत होत्या. दुधाच्या पावडरमध्ये उंदराच्या लेंड्या, मेलेल्या पाली असतात. केळीची पावडर मिसळलेली असते
वगैरे.. वगैरे.. तर दुध पिशवीबाबतही काहीबाही ऐकायला मिळते. पॅकींग पिशवी फोडून त्यात पाणी मिसळून पुन्हा पॅक केली जाते म्हणजे अगोदर मलई व साई काढली जाते, त्यात पुन्हा पाणी टाकले जाते. एका बाजुला ग्राहकांवर अन्याय करणारे काही लोक आहेत. पण वर्षानुवर्षे ग्राहकांची सेवा करणारे व प्रामाणिक व्यवसाय करणारे दुध व्यवसायिक मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यावर सध्याच्या घडीला मोठा अन्याय होत आहे.
गेल्या काही दिवसात दुधाचे भाव सतत कोसळत आले आहेत. (दूधदराची कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात, सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. पण, हे पाच रुपयांचे अनुदान सरकारी निकषाच्या चौकटीतच अडकून पडण्याची भीती आहे. शिवाय खासगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार नाही, त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांसाठी एक मृगजळ ठरणार आहे) . सध्या ३.५/८.५ स्निग्धांश असलेल्या दुधाला जास्तीत जास्त २८ रुपये लिटर भाव आहे. एका बाजुला एका लिटरला ६० रूपये भाव देणारे ग्राहक असून त्यांना चांगले दुध मिळत नाही आणि जे अत्यंत चांगले दुध देतात त्यांना मात्र लिटरला २८-२९ रूपये भाव. अशा स्थितीत दुध उत्पादक व ग्राहक यांच्यात विषमता आहे. सध्या कडबा, पशुखाद्य, पेंड याचे भाव गगणाला भिडले आहेत. गाई/म्हैस यांच्या किंमती, मजुरांची मजुरी, शेतातील पाण्याची स्थिती, वीजेचा त्रास, त्यातून निर्माण केलेला घास, जनावरांवरील उपचार, औषधे, डॉक्टर यांचे शुल्क या सर्व बाबीचा विचार केलातर दुधाचा लिटरला खर्च येतो ३० ते ३५ रुपये आणि बाजारात त्याला भाव २८ रूपये लिटर मिळत असेलतर शेतकऱ्यांनी काय करावे ? हा सर्वांसमोर प्रश्न पडला आहे.
LEAD शाळांनी हाती घेतलेला हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांशी अखंडपणे संरेखित करतो. विद्यार्थ्यांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्साह वाढवणे, नवनिर्मिती आणि व्यावहारिक शिक्षण देणे हे शाळेचे उद्दिष्ट आहे. कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनशील शैक्षणिक अनुभवांसह विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याची शाळेची वचनबद्धता या उपक्रमातून दिसून येते. टेकफेस्ट IIT मुंबई 2023 विद्यार्थ्यांना अत्याधुनिक नवकल्पनांचे साक्षीदार होण्यासाठी, तज्ञांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रत्यक्षात सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. ज्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान आणि वास्तविक-जगातील समस्या-निवारण यांच्यातील परस्परसंवादाची सखोल समज विकसित होण्यासाठी मदत होईल.
उत्पादीत दुधाची पावडर बनवली जाते. परदेशात दुधापेक्षा दुध पावडर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे दुध पावडर निर्यातीत भारताचे नाव मोठे आहे.अलीकडे केंद्र शासनाने दुध पावडर निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पावडर विकली जात नसल्यामुळे नवीन पावडर निर्माण केली जात नाही; पर्यायाने दुधाचा वापर थांबला आहे. अर्थातच दुधाचे भाव पडले आहेत. या स्थितीत सर्वांनीच सतर्क होण्याची गरज आहे. शक्यतो दुध विक्रेत्यांनी जे आपले ग्राहक आहेत, त्यांना चांगले दुध दिले पाहिजे. पाणी घालणाऱ्यांनी तात्काळ पाणी घालणे बंद केले पाहिजे. कारण प्रत्येक दुधवाला किमान ५० ते ६० रुपये लिटरने दुध विकतो. जर आपले बांधव २८ रूपये लिटरने निर्भेळ दुध देत असतील तर आपण ६० रु. लिटरने निर्भेळ दुध का देवु नये.. हा विचार केला पाहिजे.
दुसऱ्या बाजुला जे डेअरीला दुध जाते त्या दुधाबाबत डेअरीधारक तसेच दुध उत्पादक यांनी जेवढे दुध चांगल्या भावाने जाते तेवढे विकायला हरकत नाही; परंतु जर दुध कमी भावाने घेतले जात असेलतर त्या दुधाबाबत पर्यायी विचार करण्याची गरज आहे. कारण वरच्या पातळीवरही दुध घेणारे भाव पाडून घेऊन जास्त नफा मिळवण्याचा विचार करतात. कारण ते दुध घेऊन त्याचे उपपदार्थ बनवतात आणि उपपदार्थ नियमित भावात विकतात. दुधाचे भाव जसे कमी झाले त्यापटीत खावा, पेढा, मलई, पनीर, दही, चक्का, तुप यांच्या किंमती एक रूपयानीही कमी झाल्या नाहीत. मग जर दुधाच्या उपपदार्थाच्या किंमती कमी होत नसतील तर दुधाची किंमत कमी का..? याचा विचार होण्याची गरज आहे.
प्रसंग कठीण आहे. पण त्यावर मात करण्याची गरज आहे. एकाशी चर्चा करताना त्याने सांगितले, ‘मी दुध डेअरीला घालत नाही. ‘ म्हटलं ‘का..?’ ‘काय त्याला भाव मिळत नाही, पगारीला थांबायचे, दुध डेअरीवाल्याच्या मागे लागा. तो विषयच सोडला.’ म्हटलं ‘दुधाचं काय करता..?’ तो म्हणाला.. “आमच्या वस्तीवर छानपैकी एक भट्टी लावतो. त्यात वेड्या बाभळीची लाकडे टाकतो आणि मोठे पातेल्यात दुध ढवळतो आणि बनवतो खवा. खाव्याला स्थानिक ग्राहक भेटतात. त्यांना पिवर खावा मिळत असल्यामुळे खावा शिल्लक रहात नाही. रोज नवी ऑर्डर असते.”
लोकविकास संस्थेने(वांगी) दुधाचे उपपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान हाती घेतले आहे. त्याचा त्यांना चांगला फायदा होत असून त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी आऊटलेट (दुकाने) आहेत व गावपातळीवरील दुध उत्पादक शेतकरी व संस्था या सर्वांनी आता सतर्क होण्याची गरज आहे. या प्रसंगात न घाबरता एकमेकाचे सहकार्य घेऊन यावर पर्याय काढण्याची ही वेळ आहे. जर यावेळी योग्य पर्याय काढला तर पुन्हा दुध व्यवसायाबद्दल चिंता करावी लागणार नाही. आजही मोठ्या शहरातून महागडे तुप, श्रीखंड, पनीर याची पार्सलने व मोठ्या पॅकींगमध्ये विक्री होते. मेडीकल, स्वीटमार्ट व खाद्यपदार्थाच्या दुकानात त्याची विक्री होते. तेच पदार्थ जर आपण तयार केले व त्याचे आकर्षक पॅकींग केले तर त्याची निर्मिती किंमत कमी होऊन ग्राहकाला स्वस्त मिळेल व दुध उत्पादकाला चांगले परवडेल. पेढे, मलई, बर्फी, कुंदा किंवा तसेच अन्य पदार्थ स्वीटमार्टमध्ये ३०० ते ४०० रुपये किलोने विकले जातात. २८ रुपये लिटरचे दुध, त्यात साखर व अन्य टेस्टी पदार्थ टाकून हे पदार्थ बनवले जातात. त्याचा खर्च साधरणतः एका किलोला १०० रुपये होतो व विक्री ३०० ते ४०० रूपये ! थोडा विचार केलातर हे प्रमाण किती विसंगत आहे. थोडे नियोजन व धाडसाची गरज आहे व आता आळस सोडण्याची गरज आहे. कठीण प्रसंगच प्रत्येकाला शहणपण शिकवतात. संकटच माणसाला दिशा दाखवतात, त्याप्रमाणे या संकटात दुध उत्पादकांनी केवळ दुध उत्पादीत करून चालणार नाहीतर दुधावर प्रक्रिया करण्याचे धोरण आखण्याची गरज आहे. जर येथे मोठ्या प्रमाणात उपपदार्थ निर्माण केलेतर ज्याप्रकारे देवडीचा खवा, कुंतलगीराचा पेढा याप्रमाणे आपल्या तालुक्याचीही ओळख होऊ शकते. फक्त यासाठी धाडस करण्याची व नियोजन करून विचारपुर्वक पावलं टाकण्याची गरज आहे.
✍️डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०