करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्हयावर दुष्काळाची छाया
करमाळा (सुरज हिरडे) – पावसाळा सुरू होऊन ३ महिने संपत आले तरी करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया पसरलेली आहे. ऐन पावसाळ्यात खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलेले आहे.
सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असलेले उजनी धरण सध्या १३.३६ टक्के (२४ ऑगस्ट) भरलेले आहे. गेल्या वर्षी १३ ऑगस्ट पर्यंत उजनी धरण १००% भरलेले होते. उजनी धरणामध्ये ६३.६६ टीएमसी पाणीसाठा हा मृत साठा असून त्याच्या वरती पाणी येऊ लागलं की उजनी धरण हे प्लस मध्ये येतं. काल (२४ ऑगस्ट) च्या माहितीनुसार उजनी मध्ये ७०.८२ टीएमसी पाणीसाठा असून ७.१६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
यावर्षी जुन महिना पूर्णपणे कोरडा गेला. तर जुलैमध्ये जेमतेम पाऊस झाला. पुढे पाऊस होईल ह्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. जवळ असलेल्या पैशातून बि-बियाणे, खते, पेरणी यासाठी खर्च केले. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. अहोरात्र कष्ट करुन देखील आता शेतकऱ्यांच्या हाती फक्त निराशा उरली आहे.
पुणे जिल्ह्यात सुद्धा सरासरी पेक्षा पाऊस कमी – पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसावर उजनी धरणाची पाणी पातळी अवलंबून असते. यंदा पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यातील हवेली बारामती पुरंदर तालुके दुष्काळाच्या छायेत आलेले आहेत हवेली तालुक्यात सरासरी ४०.१ टक्के, बारामती तालुक्यात सरासरी ४२.९ टक्के आणि पुरंदर तालुक्यात सरासरी ३९.५ टक्के पाऊस पडलेला आहे.
पुरेसा पाऊस झाला नसल्याने विहिरी व बोअरने तळ गाठला आहे. नदी, तलाव, नालेही कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना पैसे अधिकचे पैसे देऊन विकत घ्यावा लागत आहे. कडब्याचे दर ४००० ते ५००० वर गेले आहेत. हिरव्या चाऱ्याचे दर ३००० ते ३५०० टनवर गेले आहेत. एवढ्या महागाई चा चारा घेऊन जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांनी जड चालले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा तर तो व्यवसाय देखील अडचणीत आहे.
फळबागाची पाने पिवळी होऊन गळू लागली आहेत. फळभाज्या व भाजीपाला लागणीसाठी पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. गेल्या वर्षी पाऊस जास्त पडल्याने या भागातील शेतकऱ्यांनी ऊसाचे क्षेत्र वाढवून या पिकासाठी लाखो रुपये खर्ची घातले आहेत. यावर्षी पाऊस नसल्याने उसाचे पीक करपून चालले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची पिके येऊ शकत नाहीत, असा अंदाज आल्यानंतर पिकात पाळी घालून पिके मोडायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्याला शेतीच्या पाण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गावागावात टँकरची मागणी जोर धरू लागली आहे.
यावर्षी पहिल्या तीन महिन्यात झालेल्या अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांना पिके जगविणे, जनावरे जगविणे मुश्कील झाले आहे. महागाई वाढली आहे.
– अजित सावंत, शेतकरी, नेरले ता करमाळा जि सोलापूर
ज्या लोकांनी पिक विमा भरला आहे त्या पिकांचा शासनाने पंचनामा करुन शेतकऱ्यांना मदत करावी. जनावरांना चारा पाणी उपलब्ध करुन द्यावे तसेच दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी.