३१० रुपयांना मिळणारा युरिया विक्री कितीला करायचा ? – व्यापाऱ्यांचा कंपनीला सवाल…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : युरिया खताच्या गोणीची विक्री किंमत २६६ रुपये असून, यापेक्षा जास्त दराने युरिया विकला तर व्यापाऱ्यांना धारेवर धरले जाते, मात्र नुकताच उपलब्ध झालेला एका कंपनीचा युरिया व्यापाऱ्यांना ३१० रुपयांना घ्यावा लागला. तो आता शेतकऱ्यांना विकायचा कितीला ? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
मात्र पंढरपूर येथे रेल्वे मालगाडीतून युरियाचा माल आला. या गाडीतून २५० रुपये प्रति दराने व्यापाऱ्यांना युरिया देण्यात आला; व्यापाऱ्यांना हा युरिया स्वखर्चाने घेऊन जा, असे कंपनीने सांगितले. वास्तविक पाहता युरिया खत व्यापाऱ्यांना दुकानात पोहोच करणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे. खत कंपन्यांना वाहतुकीसाठी केंद्र सरकार अनुदान देते; मात्र बाजारात युरिया टंचाई आहे याचा फायदा घेत कंपन्यांनी कृषी विक्रेत्यांच्या माथी जास्त दराने युरिया मारला आहे.
करमाळ्यातील बिटरगाव येथील व्यापायाला प्रति गोणी ५० रुपये भाडे लागले. कंपनीने रेल्वेस्थानकात २६० रुपये युरिया दिला. वाहतूक, हमाली मिळून व्यापाऱ्याच्या दुकानात ३१० रुपयांना युरिया येऊन पडला. आता व्यापाऱ्यांनी हा युरिया केंद्र शासनाच्या निर्धारित २६६ रुपयांप्रमाणे कसा विकायचा, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. व्यापाऱ्यांनी याबाबत तक्रार केली तर त्यांचा खतपुरवठा कंपन्या बंद करत आहेत. कंपन्यांचे पाप कृषी विक्रेत्यांच्या माथ्यावर फोडले जात असल्यामुळे व्यापाऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अनुदानित रासायनिक खते विक्रेत्यांच्या दुकानापर्यंत पोहोच करणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे. असे असताना कंपन्या जर चुकीचे वागत असेल व व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना वेठीला धरत असतील तर कडक कारवाई करू. – दत्तात्रय गवसाने, (जिल्हा कृषी अधीक्षक)
खत कंपन्यांनी अनुदानित खते व्यापाऱ्यांच्या गोडावूनपर्यंत पोहोच करावीत, अशा केंद्र सरकारच्या सूचना आहेत. यासाठी केंद्र सरकार वाहतुकीसाठी कोट्यवधी रुपये अनुदान देते; मात्र रासायनिक खतांच्या टंचाईचा फायदा घेत काही कंपन्या रेल्वे स्टेशनवरुनच खत विकतात. यामुळे ट्रान्सपोर्ट, हमाल, इतर खर्च पन्नास रुपये गोणीपर्यंत जातो. जिल्हा कृषी अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालावे. – महेश चिवटे, (जिल्हाध्यक्ष शिवसेना)