वीट येथे कृषी विभागामार्फत “महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा”..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वीट (ता.करमाळा) येथे 5 जानेवारी 2023 रोजी महिला शेतकऱ्यांची शेती शाळा हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी करमाळा व मंडळ कृषी अधिकारी केतूर यांचे मार्फत घेण्यात आला. संपूर्ण राज्यात कृषी विभागामार्फत विविध योजनांमधून क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत पीकनिहाय शेती शाळा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, वीट येथे रब्बी ज्वारी पिकाची शेती शाळा कृषी विभागाचे उमाकांत जाधव यांच्या मार्फत घेण्यात आली.
वीट येथे उमाकांत जाधव यांनी तालुका कृषी अधिकारी, श्री संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी, देविदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाने कृषी पर्यवक्षक नितीन ठोंबरे यांच्या सहकार्याने cropsap योजने अंतर्गत रब्बी ज्वारी पिकाची महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा घेतली. सदर शेती शाळेमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आजच्या वर्गामध्ये ज्वारी पीकपरीसंस्था निरीक्षणे तसेच ज्वारी पिकावरील मावा या किडींचे नमुने प्रक्षेत्र भेटीदरम्यान महिला शेतकऱ्यांनी गोळा केले. प्रक्षेत्र भेट झाल्यानंतर महिला शेतकऱ्यांनी त्याचे चित्रीकरण आणि सादरीकरण केले.
शेती शाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेती पद्धतीचा अभ्यास करण्यास शिकविणे तसेच शेती संदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरील शोधण्याचा प्रयत्न करणे. तसेच इतर प्रमुख पिकांवर उद्भवणारे कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांच्या नियंत्रणाच्या उपाययोजना याबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, सदर उपायांचा अवलंब करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य शेतकऱ्यांना प्रदान करणे, क्षेत्रीय स्तरावर पिकनिक तंत्रज्ञान व त्यासंबंधी कौशल्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे पर्यावरण पूरक व हवामान अनुकूल अशा शाश्वत उत्पादन पद्धतीला चालना देणे, सुधारित व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाद्वारे पिकांवरील विविध किडी रोग त्यावरील मित्र कीटक व त्यांची शेतीतील महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देणे अशा प्रकारचे विषय या शेतीशाळा मध्ये घेण्यात येतात.
मावा किडींचे नमुने गोळा करताना महिला शेतकऱ्यांना त्यासोबतच लेडी बर्ड बीटल या मित्र कीटकांचे नमुने सापडले. सादरीकरण दरम्यान महिला शेतकऱ्यांना उमाकांत जाधव यांनी मावा या किडीचा जीवनक्रम मावा किडीचे बोर्डवर चित्र काढून समजावून सांगितले. मावा किडीचा रंग फिकट हिरवा, फिकट पिवळसर असतो.तसेच मावा किडीचे नुकसानीच्या अवस्था प्रौढ आणि पिल्ले या दोन्ही असतात. त्याचबरोबर मावा कीड पिकाच्या पानाच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषण करत असते त्यामुळे पाने पिवळी पडून झाडाची वाढ थांबते.
ज्वारी वरील “चिकटा “हा रोग मावा किडीमुळेच येतो. परिणामी कडबा/चारा ची प्रत कमी होते. तसेच उत्पन्न ही कमी होते. मावा कीड चे प्रजनन parthenogenetically होते मादी पाच दिवसांमध्ये 42 ते 50 पिल्लांना जन्म देते पिल्ले चार वेळा कात टाकतात. अशा पद्धतीने दोन आठवड्यामध्ये मावा किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. मावा कीडी ला पंख नसतात परंतु हंगामाच्या शेवटी एका शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये स्थलांतर करण्यासाठी पंख येतात. प्रक्षेत्र भेटीमध्ये महिला शेतकऱ्यांना लेडी बर्ड डिटेल या मित्र कीटकांचे नमुने सापडले त्यामुळे सदर ज्वारीच्या प्लॉटमध्ये मित्र कीटकांचा वावर आढळला त्यामुळे मावा किडींची संख्या ही आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खालीच होती. समूहगुण दर्शन कार्यक्रमांमध्ये “सेवनअप” हा सांघिक खेळ घेण्यात आला.
शेती शाळेमधील सर्व महिलांनी समूहगुण दर्शन खेला मधे उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शेवटी उपस्थित महिला शेतकऱ्यांचे आभार मानून शेती शाळा कार्यक्रमाचा वर्ग संपविण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी गोरख ढेरे, विक्रांत गनगे, विशाल गनगे, सचिन गनगे यांनी सहकार्य केले.