शहीद अमोल निलंगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्ती समाजभूषण पुरस्काराने सन्मानित - Saptahik Sandesh

शहीद अमोल निलंगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्ती समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

0

करमाळा (दि.२७) : साडे येथील शहीद जवान मेजर अमोल अरविंद निलंगे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दि.२४ जानेवारीला साडे (ता.करमाळा) येथे संपन्न झाले. यावेळी  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज भूषण स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आमदार नारायण पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून अभिवादन केले

या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. नारायण आबा पाटील, कर्नल केदार भिडे उपस्थित होते. शहीद मेजर अमोल यांचे वडील अरविंद निलंगे व मातोश्री काकी उपस्थित होत्या. व्यसपीठावर डॉ. वसंत पुंडे मेजर हंबीरराव नाईकनवरे, सोलापूर अँटी करप्शन ब्युरोचे अध्यक्ष मेजर रावसाहेब शिंदे, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळालाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांच्यासह सर्व सत्कारमूर्ती उपस्थित होते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या खालील व्यक्तींना ‘शहीद मेजर अमोल निलंगे “समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित केले

  • अ‍ॅड. राहुल झालटे (बार्शी)
  • श्री.नंदकिशोर वलटे (दै.तरुण भारत पत्रकार, प्राध्यापक, उमरड)
  • श्री. मनोज तळेकर (प्राचार्य, केम)
  • .श्री.बाळकृष्ण लावंड (प्राध्यापक, सालसे)
  • श्री. मल्हारी काळे (कै. सुभाष पाटील ग्रा. पतसंस्था, साडे)
  • श्री. पोपटराव पाटील (जि.प.शाळा, खांबेवाडी)
  • आदर्श शाळा पुरस्कार जि.प.शाळा, उमरड
यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून अमोल हे खऱ्या अर्थाने करमाळ्याचे भूषण असल्याचे मत व्यक्त केले.



कर्नल केदार भिडे यांनी शाहिद मेजर अमोल निलंगे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मेजर अमोल हे भारतीय सैन्य दलातील एक हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी होते त्यांच्या जाण्याने आमच्या प्लाटून मध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या स्मरणानिमित्त आम्ही एक ब्लड बँक स्थापन केली आहे . शहीद अमोलच्या पुण्यस्मरणानिमित्त यापुढे आम्ही आदर्श शाळेला पाच हजार रुपये देणगी देणार आहोत असे सांगितले.या वेळी मेजर भंडारे यांनी शहीद मेजर अमोल निलंगे यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

सुलेखन-प्रशांत खोलासे, केडगाव ता.करमाळा (मो. 9881145383)

अध्यक्षीय भाषणात प्रा. करे पाटील यांनी मेजर अमोल निलंगे हे खऱ्या अर्थाने पुढील पिढीचे आदर्श ठरले पाहिजेत म्हणून आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. भारत मातेसाठी आपले प्राणपणाला लावणाऱ्या या युवा सैनिकास आम्ही नमन करत असल्याचे सांगितले या स्मारक समितीसाठी यापुढेही कोणतीही मदत लागल्यास यशकल्याणी परिवाराच्या वतीने आम्ही सदैव तत्पर असल्याचे बोलून दाखवले.

या कार्यक्रमात करमाळा तालुक्यातील शहीद जवानांच्या माता पिता व पत्नी यांना सन्मानित केले गेले.यावेळी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत क्रमांक मिळविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन यशकल्याणी संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच सोलापूर एंटी करप्शन विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मेजर रावसाहेब शिंदे व उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मेजर अक्रूर शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात प्राध्यापक लावंड यांनी आपले विचार व्यक्त केले

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शहीद मेजर अमोल निलंगे स्मारक समिती साडे व यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा, साडे हायस्कूलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन साडे गावचे सरपंच, सर्व ग्रामस्थ  व आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा यांनी केले आहे.या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता / पिता, सैनिक परिवार व सर्व नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले तर आभार मेजर हंबीरराव नाईक नवरे यांनी मांडले कार्यक्रमाचा शेवट सो पुंडे यांच्या पसायदान गायनाने झाला कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!