गर्दीचा फायदा घेत बसमधून चोरट्याने केली सोन्याच्या पाटलीची चोरी

करमाळा (दि.३०) – करमाळा बस स्थानकावरून करमाळा-सोलापूर या बसमधून जाताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील २ तोळ्यांची व ७४ हजार किमतीच्या सोन्याच्या पाटलीची चोरी केली आहे. याबाबत सोलापूर येथील छाया बंडेश पांढरे या महिलेने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात करमाळा पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
दिलेले फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, मी राशीन वरून सोलापूरला जायला निघाली होते. करमाळा येथील बस स्थानकामधून करमाळा-सोलापूर या बस मध्ये चढले. त्यावेळी बस मध्ये फार मोठी गर्दी होती. मला बसायला देखील जागा न मिळाल्याने मी उभे राहूनच प्रवास केला. माझ्या कुर्डुवाडीजवळ आल्यानंतर मला माझ्या जवळील उजव्या हातातील सोन्याची पाटली दिसून आली नाही. मी बस मध्ये शोध घेतला परंतु सोन्याची पाटली मिळुन आली नाही. त्यानंतर मी माझा भाऊ यास राशिन येथील घरात पडली आहे का ते पाहण्यास सांगीतले परंतु त्याने ही घरात शोध घेऊन पाटली नसल्याचे सांगीतले. त्यानंतर मी सोलापूर येथे गेले. त्यानंतर आमची खात्री झाली की, ही सोन्याची बाटली बस मधूनच कोणीतरी चोरून नेली आहे.
या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत
करमाळा बसस्थानकातुन नेहमीच चोरीच्या घटना घडत आहेत. २२ नोव्हेंबरला करमाळा-जामखेड बस मध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्स मधील २ लाख ३० हजार रूपयांच्या दागिण्यांची चोरी झाली असल्याचा प्रकार घडलेला असतानाच लगेच दोन दिवसांनंतर २४ नोव्हेंबर ला देखील करमाळा-सोलापूर बस मध्ये देखील असाच प्रकार घडला. यामुळे अशा चोरट्यांवर लक्ष ठेवून कारवाई करावी अशी मागणी करमाळा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.




