निंभोरे–कोंढेज दरम्यानच्या रस्ते कामास सुरुवात; आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना दिलासा

करमाळा (दि. १५) – अखेर निंभोरे ते कोंढेज या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास १३ जूनपासून सुरुवात झाली आहे. हा रस्ता HAM अंतर्गत सुरू होणाऱ्या राशिन (ता. कर्जत) ते वेणेगाव (ता. माढा) दरम्यानच्या रस्ते विकास प्रकल्पात विशेष बाब म्हणून समाविष्ट करत तातडीने सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

दरवर्षी आषाढी वारीसाठी मराठवाडा, खानदेश, विदर्भातून जवळपास २५० ते ३०० दिंड्या या मार्गे—करमाळा, गुळसडी, वरकटणे, निंभोरे, वडशिवणे, सातोली, दहिवली, कन्हेरगाव, वेणेगाव (हायवे)—प्रवेश करतात. या दिंड्यांमध्ये सुमारे दोन लाख वारकरी सहभागी असतात. मात्र या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था आणि पावसाळ्यातील अडथळे लक्षात घेता वारकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वारकऱ्यांच्या तक्रारीनंतर निंभोरे–कोंढेज रस्त्याचे काम हाती घेणे गरजेचे झाले होते. गेल्या वर्षी, निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे दिंडी चालक गोसावी महाराज यांनी एका व्हिडीओ मध्ये – पुढील वारीसाठी हा रस्ता न झाल्यास मार्ग बदलण्याचा इशारा दिला होता.


आषाढी वारीसाठी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे रस्ता दुरुस्तीबाबत नुकतेच निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर HAM अंतर्गत राशिन ते वेणेगाव या ७१ किलोमीटर रस्त्याच्या मंजूर प्रकल्पातून निंभोरे–कोंढेज रस्त्याला प्राधान्य देण्यात आले.

वास्तविक या रस्त्यासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुतीत तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून ३ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र सरकार बदलल्यानंतर या कामावर स्थगिती आली. दरम्यान संजयमामा शिंदे यांनी HAM अंतर्गत २७० कोटींचा निधी मंजूर करून ७१ किमी रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. परिणामी, याच प्रकल्पांतर्गत सदर रस्त्याचा समावेश करण्यात आला. सदरची अर्थसंकल्पीय तरतूद रद्द करण्यात आली त्यामुळे प्रत्यक्षात काम सुरू व्हायला खूपच विलंब झाला.

आषाढी वारीसाठी करमाळा, गुळसडी, सरपडोह, वरकटणे, निंभोरे, वडशिवणे, सातोली, दहिवली, कन्हेरगाव, वेणेगाव (हायवे) हा परंपरागत मार्ग अधिकृत पालखी मार्ग म्हणून घोषित करण्याची मागणी वारकऱ्यांकडून अनेक वर्षांपासून होत आहे, ती अद्याप प्रलंबित आहे.

HAM अंतर्गत राशिन (ता. कर्जत) ते वेणेगाव (ता. माढा) ७१ किमी रस्त्याचे काम होणार आहे. यामुळे सावडी, राजुरी, पोंधवडी, विहाळ, अंजनडोह, झरे, कुंभेज, कोंढेज, निंभोरे, मलवडी, केम उपवटे, दहिवली, कन्हेरगाव, वेणेगाव या गावांना मोठा फायदा होणार आहे.
बातमी संपादन : सुरज हिरडे



