आनंदी ज्वेलर्समध्ये चोरी करणारी महिला गजाआड

करमाळा(दि. १६)शहरातील वर्दळीच्या जय महाराष्ट्र चौकातील आनंदी ज्वेलर्स या दुकानातून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके चोरून पसार झालेल्या महिलेचा अखेर करमाळा पोलिसांनी छडा लावला आहे. आरोपी महिलेला अटक करून तिच्याकडून तब्बल ४६ हजार रुपये किमतीचे झुमके जप्त करण्यात आले आहेत.

ही घटना ६ मे रोजी घडली होती. दिवसभराच्या व्यवहारानंतर सायंकाळी दुकानमालकाच्या लक्षात आले की, दुकानातून दोन झुमके गायब आहेत. त्यांनी तत्काळ करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

फिर्यादीनंतर पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा व शहर बीट अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून संशयित महिलेची ओळख पटली.

ही महिला रेश्मा संतोष सुकळे (वय ३७) असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या हालचालींवर पोलिसांनी पाळत ठेवली. १० जून रोजी पोलिसांनी तिच्या राहत्या घरी छापा टाकून महिला पोलीस अंमलदार शितल पवार यांच्या मदतीने पोलीस हवालदार भाऊराव शेळके यांनी तिला अटक केली.

तपासादरम्यान रेश्मा सुकळे हिने चोरी केल्याची कबुली दिली असून तिच्याकडून ५ ग्रॅम वजनाचे, ४६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुमके हस्तगत करण्यात आले आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजित माने, पो.स.इ. संदेश चंदनशिव, स.पो.फौ. डी. एस. वाडगे, पो.हे.कॉ. भाऊराव शेळके, पो.कॉ. हरीदास निमगीरे, पो.कॉ. प्रसाद काटे तसेच महिला पो.कॉ. शितल पवार यांचा मोलाचा सहभाग होता. पुढील तपास पो.हे.कॉ. शेळके करीत आहेत.



