मिरवणूक, औक्षण काढत, कुंकवाच्या पावलांनी शाळेत प्रवेश

करमाळा (दि. १६) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालसे येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालत, पहिलीच्या नव्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गावात मिरवणूक काढण्यात आली. या स्वागताने संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहारात गोड पदार्थ म्हणून जिलेबीचेही वाटप झाले. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून, त्यांचे शाळेतील पहिले पाऊल कुंकवाच्या सहाय्याने कागदावर उमटवण्यात आले आणि ती आठवण पालकांना भेट म्हणून दिली गेली.


यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थिनीचा दहावीच्या परीक्षेतील घवघवीत यशाबद्दल गौरव करण्यात आला. तिच्यासोबत मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका वृषाली सोरटे यांचाही सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमास अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना चोले यांनी भेट देऊन शाळेच्या उपक्रमांची स्तुती केली. परिसराची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी ग्रामस्थ, पालक, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्षा तहसीन मुजावर, सदस्य नागेश ओहोळ, नवनाथ पवार, गणेश जाधव, शरद काळे, धनाजी माने, निलेश सालगुडे, गोपीनाथ भोसले, कोमल भोसले, सोनाली कोळी तसेच मुख्याध्यापिका शितल कांबळे, उपशिक्षक विकास माळी, अजित कणसे, माधुरी मोरे, वृषाली सोरटे आदींनी परिश्रम घेतले.




