मराठा सेवा संघाकडून ‘कुणबी’ जात नोंदणीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा, दि. २१ जून – मराठा सेवा संघ करमाळा यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती करमाळा यांना एक निवेदन देऊन, इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टरमध्ये “कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा” अशी जात नोंद तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनात २०२५-२६ शैक्षणिक वर्षात नव्याने इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदी स्पष्टपणे करण्यात याव्यात, आणि ज्यांच्याकडे वरील जातीचे प्रमाणपत्र आहे, अशा विद्यार्थ्यांची नोंद “जनरल रजिस्टर नं. १” मध्ये योग्य पद्धतीने करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळांना लेखी आदेश देण्याची विनंती करण्यात आली.

तसेच, इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीमध्येही जातीचा तपशील योग्य प्रकारे बदलण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी पाठवण्याबाबत शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना सूचना देण्याची मागणी करण्यात आली.

हे निवेदन नगरसेवक महादेव अण्णा फंड, माजी सरपंच बापूसाहेब तनपुरे, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवेदनावर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, पत्रकार अशोक मुरूमकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या होत्या.

मराठा सेवा संघाच्या वतीने पालकांना आवाहन करण्यात आले की, ज्या विद्यार्थ्यांचा “कुणबी” जातीचा दाखला उपलब्ध आहे, त्यांनी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करून जनरल रजिस्टरमध्ये योग्य जात नोंद करून घ्यावी. तसेच, नव्याने पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदी करताना जात “कुणबी” अशीच नमूद करावी, असे आवाहन अध्यक्ष सचिन काळे यांनी केले.

या विषयावर जनजागृतीसाठी संघाच्या वतीने गावोगाव भेट देऊन विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, विस्तार अधिकारी नितीन कदम आणि मिनीनाथ टकले यांनी निवेदन स्वीकारले आणि संबंधित शाळांना त्वरित पत्र देऊन आवश्यक अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले.



