कमलाभवानी मंदिरात एनसीसीतर्फे योग दिन साजरा

करमाळा, २१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सोलापूरच्या वतीने श्री कमलाभवानी मंदिर, करमाळा येथे भव्य योग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विविध मान्यवर, विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या उपक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे योग मार्गदर्शक प्रा. रामकुमार काळे यांनी केले.


प्रमुख पाहुणे म्हणून श्री जगदंबा कमलादेवी ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. महेंद्र नगरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवीचा माळचे नवनियुक्त सरपंच अमोल चव्हाण होते. त्यांनी योग शिबिर मंदिर परिसरात आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला ९ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार महेश बळगंडे, हवालदार आदित्य जाधव, करमाळ्याचे सुप्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. व्होटकर, प्रा. रामकुमार काळे तसेच एनसीसीचे सर्व छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजया गायकवाड (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय) यांनी तर आभार प्रदर्शन टी.ओ. असिफ मुलाणी (महात्मा गांधी विद्यालय) यांनी केले.




