विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टरमध्ये ‘कुणबी’चा उल्लेख करण्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना

केम (संजय जाधव ): मराठा सेवा संघाच्या मागणीनुसार करमाळा तालुक्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टरमध्ये ‘कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा’ असा स्पष्ट जात उल्लेख करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांनी जारी केल्या आहेत.

मराठा सेवा संघ करमाळा यांच्या वतीने पंचायत समिती करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. यामध्ये इ. १ ली ते १२ वीपर्यंत शिकणाऱ्या आणि ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शाळेच्या जनरल रजिस्टर नंबर १ मध्ये अचूक व स्पष्टपणे नोंदवण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती.

निवेदनात २०२५-२६ शैक्षणिक वर्षात नव्याने पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद प्राथमिक स्तरावरच योग्य पद्धतीने करण्यात यावी, तसेच इ. २ री ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सध्याच्या नोंदींमध्येही आवश्यक ते जात तपशील अद्ययावत करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना देण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेत गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे यांनी तालुक्यातील सर्व माध्यमांतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

या सकारात्मक निर्णयाबद्दल मराठा सेवा संघ व सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, विस्तार अधिकारी नितीन कदम, मिनीनाथ टकले आणि संपूर्ण शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार माणण्यात आले आहे.




