
करमाळा/ संदेश प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ‘नागोबाचे शेटफळ’ या गावाची ख्याती आता थेट इंग्लंडपर्यंत पोहोचली आहे. सापांविषयी विशेष आकर्षण असलेल्या नऊ वर्षीय सैफीयाच्या हट्टापायी तिचे वडील डॅरेन मूडी यांनी तब्बल आठ हजार किलोमीटरचा प्रवास करत शेटफळ गाठले. दोन दिवस गावात मुक्काम करून नागपंचमी उत्सवाचा अनुभव घेत त्यांनी शेटफळकरांच्या आपुलकीच्या पाहुणचाराचीही आठवण सोबत नेली.

इंग्लंडमधील इंटेरियर डेकोरेटर व्यावसायिक डॅरेन मूडी यांची नऊ वर्षांची मुलगी सैफीया हिला विविध प्रजातींच्या सापांविषयी विशेष आकर्षण आहे. तिच्या घरीही एक साप पाळण्यात आला असून, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने सापांविषयी माहिती घेत असते. याच दरम्यान तिला सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ गावात नागाला देव मानून त्याची पूजा केली जाते, अशी माहिती मिळाली. त्यानंतर शेटफळला जाऊन प्रत्यक्ष नागदर्शन घेण्याचा तिने वडिलांकडे हट्ट धरला.

डॅरेन यांनी गुगलवरून शेटफळ आणि येथील नागपंचमी उत्सवाची माहिती घेतली. अखेर मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पिता-पुत्रीने भारत गाठण्याचा निर्णय घेतला. तब्बल आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून ते १६ ऑगस्ट रोजी सकाळी शेटफळमध्ये दाखल झाले. गावात आल्यानंतर जानवी पोळ, सूरज लावंड आणि प्रशांत नाईकनवरे यांनी त्यांना गावाची सफर घडवून आणली. यावेळी त्यांनी डाळिंब, पेरू आणि लस्सीचा आस्वाद घेतला, तसेच झाडाच्या झोक्यावर झोके घेण्याचा आनंदही लुटला. मात्र, सैफीयाची नजर होती ती जिवंत नागाच्या दर्शनाकडे…शेटफळ परिसरात नागांची संख्या मोठी असली तरी येथील ग्रामस्थ नागांचा शोध घेऊन त्यांना पकडत नाहीत. नैसर्गिकरीत्या नाग बाहेर आल्यानंतर त्याला हात जोडून नमस्कार करून पूजा केली जाते. त्यामुळे दिवसभर प्रतीक्षा करूनही नागदर्शन न झाल्याने ग्रामस्थांनी ‘आज नाही तर उद्या नक्की नाग दिसेल’, असा धीर दिला.


नागदर्शनाची तीव्र इच्छा असल्याने डॅरेन आणि सैफीया यांनी जवळील शेलगाव येथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास महावितरण कार्यालय परिसरात नाग दिसल्याची माहिती मिळताच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना तेथे बोलावण्यात आले. तब्बल तासभर एका ठिकाणी शांतपणे थांबलेल्या नागाचे दर्शन सैफीयाला झाले आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.


नऊवारी साडी, फुगडी अन् पुरणपोळी!
दुसऱ्या दिवशी नागपंचमी उत्सवात सैफीयाने नऊवारी साडी परिधान करून मराठमोळ्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली. तिने फुगडी खेळली, पतंग उडवला आणि गंगाधर पोळ यांच्या घरी खास मराठमोळ्या पुरणपोळीचा आस्वाद घेतला. प्रशांत नाईकनवरे व जिव्हाळा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनीही या परदेशी पाहुण्यांचा मनापासून पाहुणचार केला. शेटफळ व चिखलठाण ग्रामस्थांच्या वतीने डॅरेन आणि सैफीयाचा महाराष्ट्रीयन पद्धतीने फेटा व साडी देऊन सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांच्या प्रेमाने भारावलेल्या डॅरेन यांनी, “हा अविस्मरणीय अनुभव आयुष्यभर विसरणार नाही,” असे सांगत शेटफळकरांचे आभार मानले आणि गावाचा निरोप घेतला. या भेटीमुळे शेटफळच्या नागपंचमीची आणि ग्रामस्थांच्या आगळ्यावेगळ्या परंपरेची चर्चा आता सातासमुद्रापार पोहोचल्याचे चित्र आहे.



