अंजनडोह येथे तरुणावर कोयत्याने हल्ला..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२०: अंजनडोह येथे घराच्या अंगणात झोपलेल्या बाबर अभिमान काळे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना 13 ऑगस्ट रात्री घडली. या प्रकरणी राहुल नंदू काळे, विशाल राहुल काळे, शीतल राहुल काळे (सर्व रा. झरे, ता. करमाळा) तसेच लटक्या विलास शिंदे (रा. कवडगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध बाबर काळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

13 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 वाजता ते आपल्या घराच्या अंगणात झोपले असताना त्यांच्या उजव्या पायावर अचानक मारहाण करण्यात आली. त्यांनी पाहिले असता त्यांचे सासरे लटक्या विलास शिंदे व चुलत भाऊ गुल नंदू काळे तेथे दिसले. यावेळी राहुल नंदू काळे याने, “माझ्या मुलाला पोलिसांना बातमी देऊन पकडून दिले,काय असे म्हणून तसेच लटक्या विलास शिंदे यांनी, “तू माझ्या मुलीला का सांभाळत नाहीस?” असे म्हणत वाद घातला.
यानंतर विशाल राहुल काळे याने लोखंडी कोयत्याने उजव्या हाताच्या दंडावर व बोटावर तसेच उजव्या पायाच्या नडगीवर व पंजावर मारून जखमी केले.
या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.




