सुरताल संगीत विद्यालयाच्या प्रगतीसाठी सदैव पाठीशी राहणार : सोनियाताई गोरे - Saptahik Sandesh

सुरताल संगीत विद्यालयाच्या प्रगतीसाठी सदैव पाठीशी राहणार : सोनियाताई गोरे

करमाळा /संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.२४: संगीत ही केवळ कला नसून मनाला शांती, स्थैर्य आणि संस्कार देणारी साधना…

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२४: संगीत ही केवळ कला नसून मनाला शांती, स्थैर्य आणि संस्कार देणारी साधना आहे. गेल्या २९ वर्षांपासून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून गायन, वादनासह भारतीय कला-संस्कृतीची जोपासना करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. या विद्यालयाच्या प्रगतीसाठी भविष्यात कोणतीही गरज भासल्यास आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही सोनियाताई जयकुमार गोरे यांनी दिली.
कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे गुरुजी व पं. विष्णू दि. पलुसकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व गुरुजनांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी बोलताना सोनियाताई गोरे म्हणाल्या, “गेली २९ वर्षे सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गायन व वादनाचे शिक्षण घेत आहेत. विविध सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबरच समाजोपयोगी कार्य करण्याचे विद्यालयाचे योगदान उल्लेखनीय आहे. संगीतामुळे मनाला शांती व स्थिरता मिळते. अशा संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे पाठबळ देणे आवश्यक आहे. विद्यालयाला भविष्यात कोणतीही गरज भासल्यास आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीशी राहू.”

या प्रसंगी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे-पाटील, करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत तसेच ग्लॅमोवेल वेलनेस, पुणे यांच्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे यांनी मनोगत व्यक्त करून सुरताल संगीत विद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले.
महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह देशाच्या विविध भागांतून व विविध राज्यांतून आलेल्या कलाकारांनी गायन, वादन आणि नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. कलाकारांच्या दर्जेदार सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. भारतीय संगीत, नृत्य व कला-संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा यावेळी ‘सुरताल पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

डॉ. श्रद्धा जवंजाळ यांना संस्थेचा मानाचा ‘सुरताल संगीत रसिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. सुनीता टिकारे, ज्योती दास, देबाश्री मुखर्जी, बिजिता गोस्वामी, तनमना चौधरी, मृदुस्मिता दत्ता, स्निग्धा टाईड आणि भाग्यश्री पेंधे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींना मानाची पैठणी साडी भेट देण्यात आली.
कार्यक्रमास श्री. विलासरावजी घुमरे, प्राचार्य मिलिंद फंड, श्री. कन्हैयालाल देवी, श्री. श्रेणिक शेठ खाटेर, जि. प. सदस्या अश्विनीताई चिवटे, डॉ. हेमा शिराळ, सौ. सुनीता देवी, श्री. भारतभाऊ शिंदे-पाटील, संतोष शेठ शियाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. बाळासाहेब पिसे, भाजपचे लक्ष्मण केकान, महादेव अण्णा फंड, डॉ. महेंद्र नगरे, नगरसेविका स्वातीताई फंड, डॉ. स्वाती घाडगे, विष्णू शिंदे, कल्याणराव साळुंके, कल्याण फंड, बाळकृष्ण लावंड, अशोक बरडे, अक्रूर शिंदे, सतीश वीर, संतोष पोतदार, दिगंबर पवार, पाटील सर, पत्रकार दिनेश मडके, किरणकुमार नरारे, नवनाथ थोरात, किशोर नरारे, ज्योती मुथा तसेच विद्यार्थी, पालक व महिला संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नरारे यांनी केले. सूत्रसंचालन संध्या थोरे, रेशमा जाधव व अर्चना सोनी यांनी केले, तर आभार सौ. साक्षी नरारे यांनी मानले.

error: Content is protected !!