निसर्गोपचारातील उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्य हरिश्चंद्र साळुंके यांना ‘नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड’

कंदर (संदीप कांबळे) : सातोली (ता.करमाळा) येथील सदगुरू आरोग्यधामचे संस्थापक-संचालक तथा निसर्गोपचारक, नाभिचिकित्सक वैद्य हरिश्चंद्र साळुंके यांना निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड-२०२६’ प्रदान करण्यात आला. आरोग्यभूमी नॅशनल नॅचरोपॅथी असोसिएशन इंडिया यांच्या अधिनस्त नॅशनल नॅचरोपॅथी CNE-२०२६ अंतर्गत सोलापूर येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वैद्य हरिश्चंद्र साळुंके यांनी सातोली येथे सदगुरू आरोग्यधामची स्थापना करून नाडी परीक्षण, नाभिचिकित्सा, संवाहन, ॲक्युप्रेशर, निसर्गोपचार, आजीबाईचा बटवा तसेच नैसर्गिक वनस्पतींच्या माध्यमातून विविध रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्या उपचारपद्धतीचा अनेक रुग्णांना फायदा झाल्याचे सांगण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यास ज्येष्ठ निसर्गोपचार तज्ज्ञ व संवाहन मसाजिस्ट सुरेशजी नगरसेकर, ज्येष्ठ उद्योगपती आदर्श शहा, आरोग्यभूमी असोसिएशनचे श्रीकांत काटूजगी, डॉ. राजू गोल्हार, संवाहन तज्ज्ञ डॉ. अशोक पासलकर, डॉ. झांबरे, डॉ. अंजली भालेराव, डॉ. प्रविण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील वैद्य, पारंपरिक वैद्य, निसर्गोपचारक, पंचगव्य तज्ज्ञ, मसाजिस्ट, ॲक्युप्रेशर तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ आणि ॲक्युपंक्चर तज्ज्ञ उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात निसर्गोपचारकांनी समाजातील आरोग्यविषयक प्रश्न नैसर्गिक पद्धतीने सोडविण्यासाठी कार्य करण्याचा संकल्प केला. निसर्गाच्या विरुद्ध न जाता निसर्गासोबत राहून निरोगी व आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी राखता येईल, याबाबत समाजात जनजागृती करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.

‘निसर्गोपचार हीच काळाची गरज आहे,’ असे सांगत नागरिकांनी सदगुरू आरोग्यधामला भेट देऊन नैसर्गिक उपचारपद्धतीची माहिती व ज्ञान घ्यावे आणि गरजेनुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्य हरिश्चंद्र साळुंके यांनी केले.

error: Content is protected !!