मध्यरात्री महामार्गावर शंभूराजे जगताप ठरले देवदूत; समयसूचकतेमुळे गंभीर जखमीचे वाचले प्राण! - Saptahik Sandesh

मध्यरात्री महामार्गावर शंभूराजे जगताप ठरले देवदूत; समयसूचकतेमुळे गंभीर जखमीचे वाचले प्राण!

करमाळा(प्रतिनिधी): अहिल्यानगर-करमाळा महामार्गावर मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन महामार्गाच्या मधोमध पडलेल्या अज्ञात इसमासाठी करमाळा येथील युवा नेते शंभूराजे जगताप देवदूत ठरले आहेत. त्यांनी दाखवलेली तत्परता आणि समयसूचकतेमुळे त्या व्यक्तीला वेळेत वैद्यकीय मदत मिळून त्याचे प्राण वाचले आहेत.

नेमकी घटना काय?
एका घरगुती कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर येथे गेलेले शंभूराजे जगताप रात्री उशिरा एकटेच करमाळ्याकडे परतत होते. मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावरील उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक इसम गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या मधोमध रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. उड्डाणपुलावरील अंधार आणि वेगवान वाहनांची वर्दळ पाहता मागून येणाऱ्या वाहनांखाली चिरडून त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
गाडीत एकटेच असतानाही शंभूराजे यांनी क्षणार्धात परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तत्काळ जखमी इसमाला सुरक्षित दुभाजकाजवळ (Divider) हलवले. त्यानंतर विलंब न करता ‘NHAI’ च्या १०३३ या आपत्कालीन हेल्पलाइनवर आणि रुग्णवाहिकेला संपर्क साधला. अवघ्या १५ मिनिटांत आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल होईपर्यंत ते तिथेच थांबून राहिले. जखमी व्यक्तीला सुरक्षितरीत्या रुग्णवाहिकेत दाखल करून उपचारासाठी रवाना केल्यानंतरच ते पुढील प्रवासाला निघाले. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.

शंभूराजे जगताप यांनी यापूर्वीही अनेकदा महामार्गावर किंवा प्रवासादरम्यान अपघातग्रस्त दिसताच सर्व कामे बाजूला ठेवून त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचवणे, स्वतःच्या वाहनातून मदत करणे आणि प्रशासकीय यंत्रणा हलवून अनेक निष्पापांचे जीव वाचवले आहेत.  त्यांच्या या तत्परतेचे आणि कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Video Link :

https://www.instagram.com/reel/DcYcB2Yh_HP/?igsi=MTdqZjdyanR6aGpieg==

error: Content is protected !!