हिवरे येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता-अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२१:हिवरे येथील १८ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित तरुणी अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जी.एन.एम. नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने ती गावी हिवरे येथे कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी आली होती.
१४ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपी गेले. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या आईने पतीला उठवून मुलगी घरात नाही असे सांगितले.
त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा घराच्या आजूबाजूला तसेच गावात शोध घेतला. नातेवाइकांकडेही चौकशी केली; मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय वडिलांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
याप्रकरणी करमाळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
