मार्कांचा महापूर
पालकांनी आपल्या पाल्याच्या प्राथमिक शाळेपासून त्याच्या फक्त टक्केवारी कडे न पाहता त्याला त्या वर्गातील अभ्यासक्रमातील विषयांचे किती ज्ञान प्राप्त झाले आहे हे देखील पाहणे आवश्यक आहे .
अलीकडच्या काळामध्ये इयत्ता दहावीचा निकाल जर पाहिला तर तो बोर्डाचा किंवा राज्याचा 95 ते 96 टक्के लागतो जसा बोर्डाचा निकाल वाढला आहे त्याचप्रमाणे मुलांच्या मार्क मिळवण्याच्या टक्केवारी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पूर्वीच्या काळामध्ये दोन विद्यार्थी पास होणारे यांची बेरीज जर केली तर तेवढे मार्क किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त मार्क आताचे विद्यार्थी सहजासहजी मिळू शकतात याचा अर्थ मुलांची बौद्धिक क्षमता खूप वाढलेली आहे असं म्हणायचं का? पूर्वीच्या काळी कमी टक्केवारी असून देखील अनेक लोक उच्च पदावर गेलेले आहेत परंतु आज जो विद्यार्थ्यांना मिळणारा टक्का आहे तो पुढे टिकेल का याची शाश्वती नाही मुलांना खूप टक्के मार्क पडले म्हणून त्यांच्या पालकांच्या देखील अपेक्षा वाढतात चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे चांगल्या कोचिंग क्लासला पाठवणे आणि पुढील त्याची तयारी करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु इयत्ता दहावी पास झाल्यानंतर जेव्हा मुलगा अकरावीत प्रवेश घेतो तेव्हा त्यांना दहावीला मिळवलेल्या टक्केवारीनुसार त्याच्या ज्ञानाची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला तर असं दिसून येतं काय त्याने फक्त परीक्षार्थी होऊन टक्केवारी घेतलेली आहेत किंवा अंक घेतलेले आहेत परंतु त्या विषयातील ज्ञान सखोलपणे अभ्यासणे आणि त्या ज्ञानाची शिदोरी पुढच्या वर्गापर्यंत किंवा आपल्या भावी आयुष्याच्या प्रत्येक क्षणापर्यंत जपून ठेवणे हे मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही .
माध्यमिक शाळांत परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये समावेश असलेले विद्यार्थी देखील बारावी मध्ये अति अल्प गुण मिळवतात याचे महत्त्वाचे कारण पालकांनी जाणून घेणे आवश्यक आहे. बारावीत गुण कमी मिळाले तर उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचे अपयश आहे का? कारण ज्या विद्यार्थ्याला दहावी मध्ये मात्र 90 ते 95 टक्के गुण असतात त्या विद्यार्थ्याला बारावी मध्ये 50 टक्के गुण मिळतात.. एवढा फरक येण्याचे कारण म्हणजे तो विद्यार्थी दहावी मध्ये फक्त परीक्षार्थी होता परीक्षेचा साचा त्यांनी समजून घेतला त्याप्रमाणे तयारी केली आणि चांगले अंक मिळवले याचा अर्थ हे शाश्वत ज्ञान नव्हे शाश्वत ज्ञान म्हणजे जे आपण माध्यमिक विभागात शिकलेलो आहोत ते ज्ञान किमान 80 टक्के तरी पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला हवा .आज इयत्ता आठवीत गेलेला विद्यार्थी सातवीतल्या अभ्यासक्रमाबद्दल विचारणा केली असता कोरा झालेला असतो याचा अर्थ तो आठवीत आला आहे म्हणजे त्याला सातवीत अवगत झालेले ज्ञान माहित असणं आवश्यक आहे असे गृहीतक प्रत्येक शिक्षकाचे असते आज महाविद्यालयामध्ये अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर दहावीपर्यंतचे जे बेसिक नॉलेज आहे ते विद्यार्थ्यांना येत नाही आणि अकरावी बारावीचा अभ्यासक्रम मुख्यत्वे विज्ञान शाखेचा विस्तृत असल्यामुळे तो शिकत असताना विद्यार्थ्यांची मात्र ओढाताण होते .दहावीचे अंक आपल्या परिसरातील लोकांना माहीत असतात तेव्हा त्या गुणांनी तुलना करता अकरावी बारावीला कमी गुण दिसतात. बारावीत कमी गुण मिळतात याला जबाबदार कोण हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच वेळा पालक आपल्या मुलाचे अपयशाचे याचे खापर शिक्षकांच्या माथी मारतात . आपल्या विद्यार्थ्यांना जे काय दहावी मध्ये गुण मिळाले आहेत ते फक्त गुण आहेत का त्याने त्या विषयांचे सखोल ज्ञान मिळवलेले आहे का? हे पालकांनी देखील पडताळून पाहणे आवश्यक आहे.
बरीच मुलं बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या गुणाची तुलना करतात आणि डिप्रेशन मध्ये जातात तेव्हा पालकांनी आपल्या पाल्याच्या प्राथमिक शाळेपासून त्याच्या फक्त टक्केवारी कडे न पाहता त्याला त्या वर्गातील अभ्यासक्रमातील विषयांचे किती ज्ञान प्राप्त झाले आहे हे देखील पाहणे आवश्यक आहे . पालकांनी मुलांनी फक्त टक्केवारी वाढवून नाव मोठे करण्यापेक्षा गुणवत्ता किंवा ज्ञान वाढवून त्यांनी आपले नाव मोठे करावे ही अपेक्षा बाळगणे महत्त्वाचे आहे तरच पुढच्या स्पर्धेच्या काळामध्ये आपला विद्यार्थी टिकेल अन्यथा तो वैफल्यग्रस्त होईल याची खबरदारी पालकांनी घेणे आवश्यक आहे . सध्या पालक जागृत आहेत शिक्षक वर्गात शिकवतात का नाही हे जाणून घेण्यासाठी वारंवार शाळा महाविद्यालय मध्ये जातात त्याबद्दल त्यांचा अभिनंदनच आहे परंतु आपल्या पाल्याबद्दल एखाद्या शिक्षकांनी जर काही समस्या सांगितल्या तर त्या जाणून घेण्याचे त्यांच्याकडे धाडस नसते. ते आपल्या पाल्याच्या चुकावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे परिणाम पुढील काळामध्ये त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर घडून येतात तेव्हा मुलांचे लाड हे शैक्षणिक साहित्य , समतोल आहार , कपडे याच्यासाठी करावेत परंतु अध्ययन प्रक्रियेमध्ये चुकत असेल वर्गातील शिस्त बिघडत असेल तर ज्या त्या वेळेस पालकांनी त्याची कान उघडणे आवश्यक आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत.
इयत्ता अकरावी मध्ये शाखा निवडत असताना विद्यार्थ्यांची आवड, त्याचा कल ,त्याला त्या शाखेतील असलेले ज्ञान याचा थोडा पालकांनी अभ्यास करावा व त्यानुसारच आपली पुढील शाखा निवडावी तरच त्याच्या प्रगतीमध्ये यश येईल. बऱ्याचश्या वेळा आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे मुले विज्ञान शाखेत आलेले असतात परंतु त्या मुलांना गाण्याची आवड असते वक्तृत्व छान असते त्यांच्या या कलागुणांचा विज्ञान शाखेमध्ये विचार न केल्यामुळे त्यांचं अंगी असलेले गुण दाबून ठेवले जातात आणि त्याची इच्छा नसताना वारंवार तुला डॉक्टर करायचे तुला इंजिनियर करायचे असे शब्द त्याच्या कानावर पाडले जातात त्यामुळे विद्यार्थी विज्ञान शाखेत रस घेईल असे नाही आणि त्याला पुढे कितपत यश मिळेल निकाल लागल्यानंतरच समजते