करमाळाकरांची गरज ओळखून छोटू महाराज मुव्ही थिएटर निर्मिती : नागराज मंजुळे - Saptahik Sandesh

करमाळाकरांची गरज ओळखून छोटू महाराज मुव्ही थिएटर निर्मिती : नागराज मंजुळे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मनोरंजन ही काळाची गरज असून, मनोरंजनामुळे माणसाचे शरीर सदृढ राहते. युवा उद्योजक निखिल चांदगुडे यांनी करमाळेकरांची गरज ओळखून छोटू महाराज मूवी थिएटरची निर्मिती करून चांगला उपक्रम राबविला आहे; असे प्रतिपादन प्रसिध्द चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व कलाकार नागराज मंजुळे यांनी केले आहे.

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी रिलायन्स पेट्रोलपंपासमोर, बायपास रोड लगत नागरीकांच्या मनोरंजनासाठी मूवी थिएटर (छोटू महाराज ) निर्माण केले आहे. या थिएटरचा शुभारंभ श्री. मंजुळे व दिग्दर्शक मंगेश बदर यांचे हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना श्री. मंजुळे म्हणाले, की करमाळा सारख्या ग्रामीण भागात पूर्वी मनोरंजनाची ठिकाणे होती. परंतु कालांतराने ही चित्रपटगृहे बंद पडली. ही गरज ओळखून चांदगुडे यांनी छोट्या स्वरूपात का होईना नागरीकांची मनोरंजनाची सोय केली आहे. या ठिकाणी नागरीकांना सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या असून त्याचा जास्तीत जास्त चाहत्यांनी लाभ घ्यावा. याबरोबरच करमाळा शहरात अनेक जुने वैभव टिकून आहेत. त्यात सुधारणा करून त्या जपण्याची जबाबदारी आपली आहे. श्रीदेवीचामाळ येथील ९६ पायऱ्याच्या विहिरीचेही आहे त्या स्थितीत जतन करणे गरजेचे आहे, असेही श्री.मंजुळे यांनी सांगितले.

यावेळी घोटी गावचे सुपुत्र व दिग्दर्शक मंगेश बदर म्हणाले, की लहानपणी मी चित्रपट पाहून चित्रपटातील भुमिकेप्रमाणे तसा वावरण्याचा प्रयत्न करायचो. युवा उद्योजक चांदगुडे यांनी मोठ्या धाडसाने हा उपक्रम राबविला असून त्यांच्या या थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा वेगळाच आनंद येत आहे. त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा !

यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी निखिल चांदगुडे यांचेप्रमाणेच युवकांनी वेगवेगळे उद्योग निवडून आपली प्रगती करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचे कक्षप्रमुख व मुख्यमंत्र्याचे ओएसडी मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक माजी नगरसेवक कमलाकर वीर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, महादेव फंड, अतुल फंड, शिवसेना शहरप्रमुख प्रविण कटारिया, नितीन घोलप, ॲड.प्रियाल आगरवाल, बाळासाहेब इंदुरे, रणजित ढाणे, पांडूरंग जाधव, राजेंद्र घाडगे, मनोज पवार, बाळासाहेब सुर्यवंशी, लालु कुरेशी, बाळासाहेब कटारिया, प्रा. प्रदीप मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत प्रमोद चांदगुडे व निखिल चांदगुडे यांनी केले. सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार नितीन चोपडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!