दुष्काळाला तोंड देण्यासाठी भूगर्भातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन हवेच!
४० ते ५० वर्षांपूर्वी पाण्याची टंचाई अजिबात नव्हती. नदी, नाले, ओढे उन्हाळ्यात देखील भरलेले असायचे. शेतकऱ्यांना प्रत्येक शेताच्या जवळ नैसर्गिक स्रोतातून स्वच्छ पाणी जनावरांना व माणसांना मिळत असे . वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी बैलाप्रमाणे खाली वाकून तोंड बुडवून पिण्यात किंवा ओंजळीने पाणी पिण्यात जी मजा होती ती आता फिल्टर आणि फ्रिज मधले पाणी पिण्यात उरली नाही . सध्या सर्व पाण्याचे स्रोत संपुष्टात आले किंवा प्रदूषित झालेले आहेत. मी लहान असताना उन्हाळ्यात देखील ओढ्यांना दोन पुरुष पाणी असायचे ओढ्यामध्ये पाणकणीस लोहाळा हिरव्या गवताची बेटे दिसायची आणि गायी म्हशी ओढ्याला हिरव्या गवतात दात घासत असत जनावरे ओढ्याला सोडून गुराखी विटी दांडू ,कबड्डी असे मैदानी खेळ खेळत असे आज हे चित्र पाहायला मिळत नाही याचं कारण म्हणजे मानवाने केलेल्या प्रगतीचे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. पूर्वी एवढे पाण्याचे स्रोत असण्याची कारणे म्हणजे सिंचनाच्या पद्धती किंवा सिंचनासाठी आवश्यक अशी साधनसामुग्री शेतकऱ्याकडे नव्हती विहिरीवर मोट असायची त्यातून शेतीला पाणी दिले जात , कालांतराने डिझेल इंजिन आले व त्याचा वापर करून ओढे नदी यांचा उपसा सुरू झाला. नंतर विद्युत पंप आले व दहा दहा किलोमीटर अंतरावरून पाणी खेचून घेऊ लागले व शेतीची प्रगती शेतकरी करु लागले अशा पद्धतीने पृथ्वीच्या भूपृष्ठावरील पाण्याचे जे स्रोत होते त्यावर सिंचना मध्ये झालेल्या प्रगतीमुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विकास केला परंतु नैसर्गिक पाण्याचे स्रोत कमी झाली.
मानव एवढ्यावर थांबला नाही, 1972 नंतरच्या काळात पाण्यासाठी कुपनलिका घेण्यास सुरुवात झाली ग्रामीण भागामध्ये गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणून कुपनलिका घेण्यात आल्या त्याला आपण हपसा म्हणत होतो या कुपनलिकेच्या साह्याने ग्रामीण भागातील महिलांना विहिरी, नदी , नाले यातून पाणी आणण्याऐवजी घराशेजारीच पाण्याची सोय झाली त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्या संपल्या होत्या परंतु काही काळानंतर कुपनलिकेमध्ये विद्युत पंप टाकण्यात आले त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर झाला आणि प्रत्येक गावातील कुपमनलिका बंद पडल्या जोपर्यंत मानव कुपनलिकेचे पाणी हाताने काढत होता तोपर्यंत भरपूर पाणी होते . नंतरच्या काही काळात शेतकऱ्याने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कुपनलिका घेण्यास सुरुवात केली आणि भूगर्भातील पाण्याचे साठे पूर्ण संपवण्याच्या दिशेने मानव बोरवेल घेत गेले आज मराठवाड्यामध्ये जर आपण शेतीमध्ये विचार केला तर एक एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी चार ते पाच बोरवेल आहेत आणि त्यांची खोली 200 फूट ते सातशे फुटापर्यंत आहे . शहरी भागात देखील प्रत्येक एक गुंठ्याच्या घरामध्ये स्वतंत्र बोरवेल घेतले जात आहेत अशा पद्धतीने भूगर्भातील पाण्याचे साठे संपवण्यात मानवाचा खरा मोठा वाटा आहे. भूगर्भातील पाण्याचे साठे संपल्यामुळे जमीन शुष्क पडत आहे भूगर्भातील पाण्याचे साठे संपत आल्यामुळे भूगर्भात पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे पृथ्वीच्या परिवलना मध्ये देखील काही सेंटीमीटरने फरक पडलेला आहे या सर्वांचे दुष्परिणाम म्हणजे जागतिक तापमान वृद्धी होय याचे परिणाम आपल्याला या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये दिसून येऊ लागले आहेत.
भविष्यात असेच जर तापमान वाढत राहिले तर पृथ्वीवर सजीव जिवंत राहणे कठीण होईल . पुढच्या पिढीसाठी शाश्वत वातावरण निर्मिती करायची असेल तर नैसर्गिक स्रोतांचा वापर मर्यादित करून पर्यावरण संतुलन करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कुपनलिका घेण्यासाठी शासनाचे बरेचसे निर्बंध असून देखील शासन त्याची दखल घेत नाही त्यामुळे एकेका गावामध्ये दिवसाला दहा ते बारा बोअरवेल घेतली जातात. आपल्या भारत देशामध्ये पावसाचे प्रमाण जगाची तुलना करता सर्वाधिक आहे तरी देखील जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता जी आहे ती केवळ दहा टक्के असल्यामुळे सर्व पाणी समुद्राला जाते पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे, परंतु मानव वृक्षतोड करून त्या ठिकाणी शेत जमीन तयार करत आहे. त्याचबरोबर मोठमोठे औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी झाडांची कत्तल केली जाते त्यामुळे भूपृष्ठांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी झाली आहे ती वाढवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ती जतन करणे आवश्यक आहे. शेतीला पाणी देत असताना शेतकऱ्याने पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी मुबलक पाणी आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने उसाचे पीक घेतले जाते ऊसाला अतिशय कमी प्रमाणात पाण्याची गरज असते परंतु शेतकरी गरजेपेक्षा जास्त पाणी देऊन पाण्याचे साठे संपवण्याचा प्रयत्न करत आहे याचे कारण म्हणजे पाण्याच्या व्यवस्थापनाचा अभाव होय. जेव्हा शासन पाणी मोजून देईल तेव्हा मात्र वाया जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध येईल आणि दुष्काळ पडला तरी पाण्याचे स्रोत शाबूत राहतील.
सोलापूर जिल्ह्यामध्ये 120 टीएमसी चे उजनी धरण आहे परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे शेतकऱ्यांनाही योग्य पद्धतीने पाणी मिळत नाही व पिण्यासाठी शहरातील लोकांना देखील आठ आठ दिवसातून एकदा पाणी मिळत आहे याचे एकमेव कारण म्हणजे पाण्याचे वाटप योग्य पद्धतीने होत नाही . प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पुढारी पाण्याचे राजकारण करतात परंतु त्याची अंमलबजावणी कधीच पूर्ण होत नाही ही खरी शोकांतिका आहे.
✍️ प्रा. धनंजय पन्हाळकर, मो. 9423303768