दारू सोडा व पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा – गटविकास अधिकारी राऊत
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.7) : “दारू सोडा व पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा” असा उपक्रम विविध संस्था व पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी जाहीर केला आहे. याबाबत श्री.राऊत यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतीना विशेष पत्रकार दिले असून त्यात हे अवाहन केले आहे. त्या पत्रात त्यांनी म्हटले की, येथील यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, ग्रामसुधार समिती, जीवन शिक्षण परिवार व पंचायत समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये “ दारू सोडा, आपल्या पाल्याला शिष्यवृत्ती मिळवुन द्या” हा उपक्रम राबविणेत येणार असुन स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन सदर उपक्रमाची व्याप्ती संपुर्ण तालुक्यामध्ये प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.
दारूच्या व्यसनाचे शरीरावर 60 प्रकारचे दुष्परिणाम वैद्यकीय शास्त्राने सिध्द केलेले आहेत. यातले मुख्य दुष्परिणाम जठर, यकृत, पचनसंस्था, प्लीहा, रक्तवाहिन्या, हृदय, मेंदू, चेतातंतू, स्नायू, गर्भ, रक्त, जननसंस्था, इ. अनेक अवयवांवर होतात. एकूण अपघातात 20% अपघात दारूच्या प्रभावाने होतात. गुन्ह्यांमागे दारू हा एक महत्त्वाचा घटक असतो. व्यक्तिगत व कौटुंबिकदृष्टया दारूमुळे अतोनात नुकसान होते. परिणामी सामाजिक नुकसान होते. मराठीत मद्यपाश आणि इंग्रजीमध्ये अल्कोहोल अब्युज किंवा दारूची गुलामी ( Alcohol Dependency) म्हणतात, त्यापैकी एक आजार, दारूची चव घेतलेल्या १२ ते १५ टक्के लोकांना होतोच.
फक्त कोणती माणसे या १५ टक्के गटात मोडतात आणि कोणती माणसे या गटात बसत नाहीत हे ठरवण्याचे कोणतेही मापन उपलब्ध नाही. दारूची चव घेतलेल्या माणसाला हा आजार होण्याची १५ टक्के शक्यता असते. घरातला एक माणूस दारूचा गुलाम झाला की त्याच्या आसपासच्या किमान वीस जणांचे तरी जीवन नासते. त्रासाला, हिंसेला आणि निर्दयतेला बळी पडते. त्याच्या शरीराचे नुकसान होते ते वेगळेच. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा कोणताही अवयव नाही जिथे दारूचा विपरीत परिणाम होत नाही. माणूस दारू पिण्याच्या आजारात अडकला की काय होते? तो एका बाजूला मानसिक गुलामी आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक गुलामी या कात्रीत सापडतो.
दोन्ही कात्रीची पाती धारदार असतात. मानसिक ओढ इतकी अनावर असते की ती ओढ – आसक्ती त्याला मला आत्ताच्या आत्ता, कोणत्याही परिस्थितीत, आणि कोणतीही किंमत मोजून दारू हवी म्हणजे हवी’ या विचारांच्या तो संपूर्णपणे आधीन होतो. इथे त्याला आपण करतोय ते चांगले का वाईट हे समजत नाही. आपण दारू घेतली तर शरीरावर, कुटुंबीयांवर काय परिणाम होतील याची फिकीर न करता माणूस दारू पितो. हीच ती मानसिक गुलामगिरी. दुसऱ्या बाजूला दारू रिचवायची क्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेली. म्हणजेच शरीर काही कालावधीनंतर दारूला वेगळ्या प्रकाराने प्रतिसाद देऊ लागते. म्हणजेच त्याचीस दारूबद्दलची सहन-वृत्ती (टॉलरन्स) त्याचबरोबर पहिली प्यायलेली उतरल्यावर शरीर पुन्हा दारूची मागणी करू लागते. हात-पायांची थरथर, अंग दुखी, उलटय़ा, जुलाब असे शारीरिक बंडाचे विविध प्रकार दिसतात. हीच ती शारीरिक गुलामी या दोन्ही बाजूने कात्रीत सापडलेल्या व्यक्तीला काय करावे हे सुचत नाही आणि त्याची ( Spiritual Bankruptcy) नैतिक अधोगती होते. म्हणजेच काय त्याच्या व्यक्तिमत्त्वातले काही दोष डोके वर काढतात तर काही दोष नव्याने सुरू होतात. खोटे बोलणारा माणूस हा दारूच्या काळात इतक्या जणांना फसवतो की त्याची त्याला गणतीच ठेवता येत नाही.
या आजारात सर्वात जास्त होरपळून निघते ती त्याची पत्नी-सहचरी. मग आई आणि बिचारी मुले. घरात सतत अशांती, शारीरिक, मानसिक शाब्दिक हिंसाचार, आरोप-प्रत्यारोप, संशय आणि भीती अशा वातावरणाने सबंध कुटुंब जीवन झाकोळून जाते.
दारू सोडण्यात सर्वात महत्वाचा घटक आहे स्वयंस्फूर्ती. यावेळी गावातील दारूच्या व्यसनाने व्यसनाधिन झालेल्या व्यक्तीने 15 ऑगस्ट 2022 रोजी दारू सोडणेबाबतची स्वयंस्फुर्तीने शपथ ग्रामपंचायतीसमोर घ्यावयाची आहे की, “इथून पुढे मी कुठल्याही प्रकारचे मद्यप्रशान करणार नाही आणि पुढील 15 ऑगस्टपर्यंत 2023 पर्यंत संबंधित व्यक्तींने त्यांचे तंतोतंत पालन केले तर तालुकास्तरावरील अधिकारी / पदाधिकारी यांचे उपस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचा यथोचित सत्कार करून त्यांच्या पाल्याला पुढील वर्षी शिष्यवृत्ती घोषित केली जाईल. यासाठी संबंधित व्यक्तीने समाजासमोर घोषणा केल्याने त्या व्यक्तीस समाज मदत करू शकतो आणि या व्यसनातून त्याला बाहेर काढू असेही श्री राऊत यांनी म्हटले आहे.