मकाई सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्रीत घोटाळा संचालक मंडळाच्या मालमत्तेवर चढणार बोजा : प्रा. रामदास झोळ

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याने उत्पादीत केलेली साखर विक्री केली असून, या साखर विक्रीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. एवढेच नाहीतर ही साखर चोरीला गेल्याचा आरोप दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी केला आहे. जर साखर चोरीला गेली नसलेतर विक्री केलेल्या साखरेचा हिशोब देवून सभासदांच्या ऊसाची बिले तात्काळ द्यावेत; अशी मागणी प्रा.झोळ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्यावर चालू गळीत हंगामातील एफआरपी थकवल्यामुळे कारखान्यावर बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत प्रा. झोळ माहिती देत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की कारखान्याचे दीड लाख गाळप होऊनही फक्त अडीच लाखाची साखर शिल्लक आहे. ऊस वाहतूकदार, शेतकरी यांचे २६ कोटी ३२ लाख १८ हजार रूपये व्याजासह देणे आहे. त्यामुळे कारखान्यावर बोजा चढविण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. लेखापरीक्षक वर्ग-१ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची यादी सादर केली आहे.
या यादीमध्ये कारखान्याकडे बँकेतील व्यवहार ८३५.५८ लाख, कारखान्याची जमीन, बिल्डींग, प्लॅन मशिनरी, फर्निचर, वाहने आदी ६६०५.२५ लाख व कारखान्याकडे २ लाख ७५ हजार रूपयाची साखर शिल्लक असा एकूण ७१८३.२० लाख रूपयाचा शिल्लक असल्याचा तपशील दिला आहे. लेखापरिक्षकाने दिलेल्या अहवालात मोलॅसेस व बगॅज शिल्लक नसल्याचा तपशील दिला आहे व साखर फक्त २ लाख ७५ हजार रूपयाची शिल्लक असल्याचा तपशील दिला आहे.
याचा अर्थ कारखान्याकडे कोणत्याही प्रकारची साखर शिल्लक नसून उत्पादीत झालेल्या साखरेची विल्हावाट संचालक मंडळाने परस्पर लावली असून, या साखर विक्रीत मोठा घोटाळा झाला असून, करोडो रूपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे आम्ही साखर आयुक्तांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असून, कारखान्याच्या जबाबदार संचालक मंडळावर कारवाई करणार आहोत. विशेष म्हणजे या सर्व कारभाराला बागल कुटूंबिय जबाबदार असून, त्यांचेबरोबर ज्या संचालकांचा काही संबंध नाही; अशांनाही बागलांमुळे नाहक त्रास होणार आहे.
कारखान्याकडील चालू मालमत्तेचे मुल्य आरसीसी आदेशातील रकमेपेक्षा कमी असल्याने स्थावर मालमत्तेच्या मुल्यातून थकीत एफआरपीची रक्कम जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे संचालक मंडळाकडून वसुल करण्यात येणार आहे. या वसुलीसाठी तत्कालीन संचालक मंडळाच्या स्थावर मालमत्तेवर बोजा नोंद होणार आहे. यामुळे बागल गटाला हा हादरा देणारा निर्णय असून, संचालक मंडळाला तात्काळ सभासद, कामगार व इतर देणी द्यावी लागणार आहेत. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विकलेल्या साखरेचा हिशोबही कारखान्याने दिलेला नसल्याने, या साखरेचे नेमके काय केले.. याचेही उत्तर बागल कुटूंबाने द्यावे; असाही जाब प्रा. झोळ यांनी विचारला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, की मकाई कारखाना अडचणीत असताना व शेतकऱ्यांचे पैसे गेल्या सहा महिन्यापासून मिळत नसतानाही या गंभीर बाबीकडे तालुक्यातील विद्यमान आमदार व माजी आमदार यापैकी कोणीही बोलत नाही किंवा या बाबीकडे लक्ष देत नाही. याचा अर्थ हे सर्वजण आतुन एक असून प्रत्येकाने सत्ता वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजुला ठेवून कारखान्याच्या या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे, असेही आवाहन प्रा. झोळ यांनी केले आहे.
झोळ यांचेकडून सभासदांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न… आरसीसीची कारवाई महाराष्ट्रातील एफआरपी न दिलेल्या प्रत्येक कारखान्यावर होत आहे. मकाई कारखान्याची साखर केंद्र सरकार व राज्याच्या नियमानुसार विक्री करून मागील व चालू देणी दिली आहेत. सदरची देणी देताना स्वत: कारखान्याने कोणतेही कर्ज कोणतेही बँकेकडून न घेता सर्व देणी अदा केली आहेत. याचं खरं तर कौतुक करणे गरजेचे असताना देखील शेतकरी सभासदांना अडचणीत आणणे आणि मुद्दाम होवून कारखान्याची बदनामी करणे; याकरीता बेछुट आरोप केले आहेत. आत्ता कर्जप्रकरण मार्गी लागत असताना जाणिवपूर्वक बँक आणि सभासदांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. अशा बेछुट आरोपांना आम्ही मात्र घाबरत नसून, या आरोपाबाबत अब्रुनुकसानीचा दावा लवकरच दाखल करणार आहेत. …दिनेश भांडवलकर (चेअरमन, मकाई)





