मकाई कारखान्यातून साखरेची पोती चोरताना दोघांना रंगेहाथ पकडले
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्यातून साखरेची चार पोती चोरून नेत असताना दोघांना कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार १ फेब्रुवारीला साडेसात वाजता घडला आहे. या प्रकरणी कारखान्याचे एमडी हरिश्चंद्र प्रकाश खाटमोडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मकाई कारखान्याच्या गोडावून मध्ये ८०० क्विंटल साखर साठवून ठेवली आहे.
१ फेब्रुवारीला साडेसात वाजता कारखान्याचे सुरक्षा रक्षक आजिनाथ भोसले यांचा फोन आला. त्यात त्यांनी सांगितले की साखरेच्या गोडावूनचे शटर उघडल्याचा आवाज आल्यानंतर आम्ही तेथे गेलो असता, योगिराज बापू पवार (रा. देलवडी) याने त्याच्या स्कुटी गाडी क्र. एमएच ४५ एआर ४१५१ व एक अनोळखी इसम त्याच्या डिलक्स मोटारसायकलवर प्रत्येकी ५० किलो वजनाची चार साखरेची पोती आढळून आली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले रमजान मुलाणी, दत्ता बारवकर, मुकूंद गिरमकर यांनी त्यांना चोरी करताना पकडले व पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. यावेळी चोरी केलेली साखर जप्त करणत आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विनायक माहूरकर करत आहेत.