उजनीतील कुगाव ते शिरसोडी दरम्यानच्या पुलासाठी ३९५ कोटी ९७ लाखाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : उजनी धरण बॅक वॉटर क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते करमाळा तालुक्यातील कुगावला जोडणारा पूल उभारण्यासाठी काल दि.१५ मार्च रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला असून त्यात ३९५ कोटी ९७ लक्ष ३२ हजार अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
उजनी धरणाची निर्मिती झाल्यामुळे पाणलोट क्षेत्र निर्माण झाले. त्यानंतर करमाळा तालुक्यातील नागरिकांना इंदापूर तालुक्यात जाण्यासाठी जेऊर-टेंभुर्णी-इंदापूर असा सुमारे ७०-८० किलोमीटरचा दोन अडीच तासांचा प्रवास करावा लागत आहे. याला पर्याय म्हणजे करमाळा तालुक्यातील कुगाव,चिखलठाण येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी, कालठण, शिरसोडी, पडस्थळ अशा उजनी काठावरील गावांना खाजगी बोटीद्वारा प्रवास करावा लागतो. याच बोटीतून दुचाकीची वाहतूक केली जाते. परंतु हा पर्याय सर्वांनाच सोयीस्कर नसून धोकादायक देखील आहे. त्यामुळे दोन तालुक्यातील दळणवळण सोईस्कर होण्यासाठी करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यातून मोठा पूल उभारण्याची मागणी करत होते.
इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी १ मार्च २०२४ ला शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पुलाबाबत मागणी केली. भरणे यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याठिकाणी उजनीच्या पाण्यातून पूल होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागास पूल उभारण्यासाठी अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश दिले. त्यानुसार १५ मार्च २०२४ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शिरसोडी ते कुगावला जोडणारा पूल उभारण्यासाठी ३९५ कोटी ९७ लक्ष ३२ हजार अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता यापुढे अजून विविध शासकीय विभागाच्या मंजुऱ्या, तांत्रिक मंजुऱ्या मिळण्याचे बाकी आहे. त्या मिळाल्यावर पुढे काम सुरू होईल. सार्वजनिक सदर पुलाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या पुलाचे हे असणार फायदे
- नव्याने पूल झाल्यानंतर करमाळा व इंदापूर तालुक्यातील अंतर सुमारे ८० किलोमीटर ने कमी म्हणजेच दोन अडीच तासाचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात दळणवळण वाढून विकासास गती मिळणार आहे.
- करमाळा तालुक्यातील नागरिकांना इंदापूर, बारामती, भिगवण येथे जाण्यासाठी अंतर कमी झाल्याने तेथील बाजारपेठ, दवाखाने, कॉलेजेस आदी सुविधा मिळविणे सोपे होणार.
- मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तयार होणार
- उजनी बॅक वॉटर परिसराच्या गावातील शेतकऱ्यांना उसासाठी पर्यायी कारखाने उपलब्ध होणार, केळी व इतर भाजीपाला उत्पादकांना जेऊर-टेंभुर्णी-इंदापूर असा वळसा न घालता पुण्याकडे जाणे सोपे होणार.
- वाहतुकीची सोय उपलब्ध झाल्याने मोठ मोठे उद्योग धंदे वाढण्यास मदत होईल व रोजगार वाढणार
- उजनी बॅकवाॅटर परिसरात पर्यटनाचा विकास होऊ शकतो
- कुगाव हनुमान मंदिरास व रुई येथील बाबीर मंदिरास भाविकांना भेट देणे सोपे होणार
- उजनी बॅकवाॅटर परिसरातील बोटींग व्यवसायाला चालना मिळणार
कुगाव ता करमाळा जि सोलापूर हे ठिकाण भीमा नदीच्या काठी असून कुगाव ला भीमा नदीच्या पात्राने तिनही बाजूला वेढले आहे. कुगाव गावच्या नदी पात्रासमोर सात गावांचे क्षेत्र असून यात सोगाव, वाशिंबे, गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोडी, पडस्थळ या गावांचा समावेश होतो सध्या हनुमान जन्मभुमीत जाण्यासाठी चार जलमार्ग व एक भुमार्ग मंजूर आहे. हनुमान जन्मभुमीत भुमार्गाने जाण्यासाठी १४० किलोमीटर चा नाहक वळसा मारावा लागतो तर हनुमान जन्मभुमीत जल मार्गाने जाण्यासाठी शासनाने चार मार्ग मंजूर केले आहेत पण शासकीय बोटी किंवा जलथांबे अशा कोणत्याही प्रकारचा सोयी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यामुळे हनुमान भक्तांना व परिसरातील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन खाजगी नौकांचीच मदत घ्यावी लागते त्यापैकी सर्वात जवळचा मार्ग कुगाव ते शिरसोडी पूल मंजूर झाल्याने या परिसरातील अर्थकारणाला आता चालना मिळणार आहे.
-धुळाभाऊ कोकरे, कुगाव, ता.करमाळा ( माजी संचालक आदिनाथ कारखाना)