शिस्तप्रिय मुख्याध्यापक – सुखदेव साखरे (सर)
करमाळा : राजुरी येथील राजेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुखदेव तात्याबा
साखरे हे अतिशय कडक शिस्तीचे व साहित्य, मराठी वाड:मयावर निर्विवाद वर्चस्व गाजविणारे शिक्षक होते. ९ सप्टेंबरला त्यांचे आकस्मात निधन झाले.
डोक्यावर पांढरीशुभ्र पांढरी टोपी, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चेष्मा, हातबाहीचा शर्ट असलेला सफारी ड्रेस, उंच शरीरयष्टी असं देखणं व्यक्तीमत्व होतं. लहानपणीच आईचे छत्र हरपल्याने त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना सर्वजण नाना म्हणून ओळखत होते. त्यांचे राजुरीत सातवी पर्यंत तर छत्रपती विद्यालय कोर्टी येथे दहावी पर्यंत, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी.ए. व अध्यापक विद्यालय सोलापूर येथे बी.एड चे शिक्षण पूर्ण झाले. त्यांची शिक्षणाची गती पाहून मांजरगाव येथील कै. साहेबराव आण्णा पाटील यांनी त्यांना स्वत:ची सायकल शाळेला जाणेयेण्यासाठी दिली होती. अशाप्रकारे अडचणीवर मात करत ते शिक्षण घेत होते. बी.एडच्या शिक्षणावेळी एका व्यक्तीने त्यांना मुंबईला बोलावून घेऊन त्यांची फसवणूक केली होती. पण त्यावर त्यांनी मात करून बी.एड पूर्ण केले.
राजेश्वर विद्यालयाचे ते पहिले मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक म्हणूनच ते सेवानिवृत्त झाले. सुरूवातीचे सात वर्षे कोणताही मोबदला न घेता त्यांनी शाळा चालवली. या काळात त्यांना शिपाई, शिक्षक आणि मुख्याध्यापक अशी तिहेरी जबाबदारी पार पाडावी लागत होती. विद्यार्थ्यांना संस्कार कसे द्यावेत हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. हूशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना हात धरून पुढे आणणे ही त्यांची हातोटी होती. मुख्याध्यापक म्हणून काम करताना सावडी येथील कुलकर्णी नावाच्या विद्यार्थ्यावर बोर्डाकडून पेपर तपासताना चूक झाली होती. त्यासाठी त्यांनी बोर्डात संघर्ष करून त्या विद्यार्थ्यास न्याय मिळवून दिला होता. प्रा. डॉ. संजय चौधरी यांचे व्यक्तीमत्व घडविण्यात नानांचा मोठा वाटा होता. ते मुख्याध्यापक असताना त्यांच्या समोरून जायची अनेकांना भिती वाटायची. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये झोकून देऊन काम केले. तसेच मुलांच्या व मुलींच्या नातवंडामध्ये ते अतिशयम रमून जात होते. सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते अनेक विद्यार्थ्यांना नावानिशी ओळखत होते आणि गरज पडेल तिथे मार्गदर्शन करत होते.
शिक्षणाबरोबरच गावातील धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग मोठा असायचा. नामदेव महाराजांची पुण्यतिथी, वैद्यनाथ स्वामी महाराजांचा आषाढी उत्सवात ते हिरीरीने भाग घेत होते. रामायण, महाभारत, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा याचे ते कायम अभ्यास करत होते. गुरूवर्य ह.भ.प.निवृत्तीदादा हंडे महाराज यांच्यावर त्यांची नितांत श्रध्दा होती. भक्तीमय मार्गातच त्यांचे निधन झाले. ‘याचसाठी केला होता अट्टाहास.., शेवटचा दिस गोड व्हाव..! तुका म्हणे एका मरणेचि सरे । उत्तमची उरे कीर्ती मागे ॥
…श्रीकांत साखरे, राजुरी