पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल तळेकर यांचे निधन, मूळगावी केम येथे करण्यात आले अंत्यसंस्कार
केम (संजय जाधव) – मूळचे केम येथील असलेले व पालघर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चांगदेव तळेकर यांचे दिनांक २२ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. पालघर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. केम येथील शासकिय इंतमांत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे 53 होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व मुलगी सहा भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे.
विठ्ठल चांगदेव तळेकर हे १९९१ साली मुंबई येथे पोलीस भरती झाले होते. त्यांची ३२ वर्ष सेवा मुंबईतील वेगवेगळया पोलीस स्टेशन मध्ये झाली होती. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. २०२३ मध्ये त्यांना पालघर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली होती व तेथेच ते सध्या कार्यरत होते. दि.२२ रोजी पोलीस ठाण्यातील कामकाज संपवून घरी आले होते. रात्री ९.४० च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना त्वरीत जवळच्या हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री १० वाजता अटॅक आला व त्यामध्ये त्यांची प्राण ज्योत मावळली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी केम येथे आणण्यात आले.
केम येथील शासकिय इंतमांत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास त्यांच्या मुलाने अग्नी दिला. या पार्थिवासोबत आलेले करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, केम पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे,जमादार रणदिवे हवालदार सातव पोलीस काॅन्स्टेबल घुगे यांच्या अधिपत्याखाली सोलापूर मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक पवार एस आय, डी.आय मानखेडे, डी.आय बुवा व ईतर पोलीस कर्मचारी यांनी हवेत पाच राऊंड झाडून सलामी दिली. अंत्यविधीवेळी केम येथील विविध क्षेत्रातील लोकांची यावेळी उपस्थिती होती. त्यांच्या निधनाने केममध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी व्यक्त केल्या भावना
स्व. विठ्ठल तळेकर यांच्या निधनानंतर त्यांचे बालमित्र व गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, विठ्ठल तळेकर हे माझे वर्ग मित्र होते. शाळेत असताना ते कबड्डी खोखो स्पर्धेत नेहमी सहभागी असायचे व आमच्या शाळेतील नामांकित खेळाडू होते. १९९१ साली ते पोलीस दलात दाखल झाले. नोकरी निमित्ताने विठ्ठल हे मुंबई सारख्या शहरात जरी राहत असले तरी त्यांनी आपल्या जन्मभूमीशी जोडलेली आपली नाळ कधीच तोडली नाही. ते गावाकडील लोकांशी ते नेहमी संपर्कात असायचे. आमच्या 1987/88 दहावीतील बॅचच्या मित्रांना ते दररोज सकाळी संदेश देणारे मेसेज पाठवत. अनेकवेळा ते आमच्या सर्व वर्ग मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ते विडिओ काॅल करून देत होते. माझे शेवटचे बोलणं गणपती बंदोबस्त असताना फोन करून झाले होते. तसेच ९ जुन रोजी त्यांच्या बहिणीच्या सावडण्याच्या कार्यक्रमात त्यांच्याशी शेवटची भेट झाली होती. सोमवारी सकाळी माझा वर्ग मित्र अर्जुन तळेकर यांचा सात वाजता फोन आला व आपला मित्र विठ्ठल गेल्याचे सांगितले. त्यावेळी माझा विश्वासच बसला नाही व फार दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो हीच गोमातेचे चरणी प्रार्थना व आम्ही दहावीच्या 1987/88 बॅचचे सर्व वर्ग मित्र या दुःखात सहभागी आहोत व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु.