केमचे प्रलंबित 33 केव्ही लाईनचे काम लवकर पूर्ण करण्याचे खासदार मोहिते पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश

केम(संजय जाधव) : केम गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला विजेचा प्रश्न अखेर मार्गी लावण्याच्या दृष्टीने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यासंदर्भात स्वतः पुढाकार घेत, अकलूज येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केमसाठी स्वतंत्र 33 केव्ही लाईनच्या कामास तातडीने गती देण्याचे स्पष्ट आदेश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिले.

मागील नऊ वर्षापासून येथील कुंकू कारखानदारांनी पाठपुरावा करून केम बे साठी जेऊर येथील 220 के व्ही सबस्टेशन मधुन स्वतंत्र 33 के.व्ही ची आठ किमी लाईन मंजूर करवून घेतली आहे. सदरील लाईनचे टेंडर देखील दोन वर्षापूर्वी पार पडले आहे. यानंतर अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा प्रत्यक्ष काम सुरु न झाल्याने २४ जूनला केम ग्रामस्थांनी गावची बाजारपेठ बंद ठेवून जेऊर वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण केले होते. याची दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली.

बुधवारी (दि. 25) माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी अकलूज येथे अधिकाऱ्यांसोबत खासदारांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत केम गावासाठी स्वतंत्र 33 केव्ही विद्युत वाहिनी व बे-ब्रेकर संदर्भात चर्चा झाली.

महावितरणचे अधीक्षक अभियंता माने (सोलापूर) व इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य अभियंता (बारामती) यांच्याशी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट संवाद साधला. केमसाठी स्वतंत्र 33 केव्ही लाईनसाठी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावर श्री. माने यांनी काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

तसेच, वडशिवणे तलावात उजनीच्या ओव्हरफ्लो पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सरपंच राहुल कोरे, सचिव मनोज सोलापूरे, कुटुंब उद्योगपती धनंजय सोलापूरे, गोरख खानट, अरविंद वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
केम ग्रामस्थांनी जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला. – सारिका कोरे, सरपंच, केम ग्रामपंचायत




