भोंदूगिरी व आर्थिक फसवणूक प्रकरणी मनोहर भोसले यांना पुन्हा अटक -

भोंदूगिरी व आर्थिक फसवणूक प्रकरणी मनोहर भोसले यांना पुन्हा अटक

0

करमाळा(दि. २५):   करमाळा तालुक्यात घोटी येथे मनोहरधाम नावाचे आश्रम चालवणारे कथित आध्यात्मिक गुरु व सध्या जामिनावर असलेले मनोहर भोसले यांना काल (दि.२४ एप्रिल) सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील मांजरी परिसरात ताब्यात घेतले आहे. आर्थिक फसवणूक व भोंदूगिरी प्रकरणी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

कुर्डुवाडी पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार, व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत भोसले यांनी एका भक्ताकडून दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी संबंधित व्यक्तीकडून ५० हजार रुपये घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

या आधी देखील गुन्हे :

पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर भोसले यांच्याविरुद्ध यापूर्वीही सोलापूर व पुणे ग्रामीण भागात एकूण चार गुन्हे दाखल आहेत. यामध्ये महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे. करमाळा, सोलापूर तालुका, बारामती आणि दौंड पोलिस ठाण्यांमध्ये विविध प्रकरणे नोंद झाली आहेत.

मठ व कार्यक्षेत्र विस्तार
मनोहर भोसले यांनी करमाळा तालुक्यातील घोटी येथे तसेच कर्नाटकातील गाणगापूर येथे मठ व मंदिर उभारले असून, तेथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होत असल्याची माहिती आहे. सुरुवातीला करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे मठ स्थापन केला होता. तिथे अनेक वर्षे त्यांचा मठ सुरू होता. त्या ठिकाणी सामान्य लोकांपासून, उद्योजक, राजकीय नेत्यांचे येणे जाणे सुरू होते. २०२१ मध्ये त्या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि ग्रामस्थांचा विरोध वाढल्यानंतर त्यांनी आपले आश्रम घोटी येथे हलवले. या ठिकाणी दर अमावस्या पौर्णिमेला आश्रमात हजारो भक्त येतं असतात. आलेल्या भक्तांचे भविष्य सांगायचे काम मनोहर भोसले करत असल्याची माहिती समोर आली आहे.

२०२१ मधील प्रकरण
२०२१ मध्ये बारामती तालुक्यातील एका कुटुंबाची ‘थायरॉईड कॅन्सर’ बरा करण्याचे खोटे आश्वासन देत बाभळीचा पाला व भंडाऱ्याच्या नावाखाली तब्बल २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भोसलेवर झाला होता. या प्रकरणातही बारामती पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

महिलेवर अत्याचाराचा आरोप
करमाळा पोलीस ठाण्यात एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा यापूर्वी नोंदवण्यात आला होता. अत्याचाराच्या प्रकरणात अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता आणि सध्या ते जामिनावर बाहेर होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी घोटी व गाणगापूर येथे मठ स्थापन करत आपले प्रस्थ वाढवणे सुरूच ठेवले.

या प्रकरणात अधिक सखोल तपास सुरू असून, आणखी कोणत्याही नागरिकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!