करमाळा येथे पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकमधून ७००० रुपयाचे डिझेल चोरी

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२७: शहराजवळील बायपास नगर रोडवरील इंडियन ऑईल कंपनीच्या सप्तरंग पेट्रोलपंपावर उभी असलेल्या आयशर वाहनातील डिझेल चोरी झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात सैफन महमद बागवान (रा. नालबंद नगर,करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की माझ्या मालकीची लाल रंगाची सहा टायरची आयशर गाडी (क्र. MH-12 VT 3786) ही दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास चालक गणेश शिंदे यांनी सप्तरंग पेट्रोलपंप येथे उभी केली होती.

दि. २२ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजता चालक गाडी घेण्यासाठी आला असता गाडी सुरू होत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तपासणी केली असता डिझेल टाकीचे झाकण तोडलेले दिसून आले. टाकीतील अंदाजे ७६ लिटर डिझेल (सुमारे ७,००० रुपये किंमतीचे) अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे उघड झाले.

या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पेट्रोलपंप परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी करमाळा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

