करमाळ्यात मद्यधुंद ट्रक चालकावर पोलिसांची कारवाई

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा ता.२७: शहरातील देवीचा माळ परिसरात दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्या चालकावर करमाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. या घटनेमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी वैभव राउत, हिंगमिरे व कांबळे हे देवीचा माळ परिसरात वाहतूक नियमन करत होते. यावेळी समोरून येणारा ट्रक (क्र. KA-32 C 8394) संशयास्पदरीत्या अडखळत चालवला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तात्काळ ट्रक थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव एम. डी. नियामत अली (वय ३९, रा. चिंचोली, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याच्या तोंडातून दारूचा तीव्र वास येत असल्याने पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली. या तपासणीत संबंधित चालकाने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.




