जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड- रोख रकमेसह १० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
.jpeg)
करमाळा(संदेश प्रतिनिधी) वांगी न.१ येथे एका बंद घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे. पंचांसह पोलिस पथकाने अचानक कारवाई करत घटनास्थळी जुगार खेळताना आरोपींना रंगेहाथ पकडले.

यात पोलीस कॉन्स्टेबल चेतन अशोक पवार यांनी फिर्याद दिली आहे, त्यात म्हटले की,बंद घरामध्ये वर्तुळाकार टेबलवर पत्त्यांचा डाव टाकून जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी महादेव आप्पासाहेब साळुंखे (रा. भिवरवाडी, ता. करमाळा) गणेश ठोंबरे केतुर नंबर २, आकाश अवघडे सिद्धार्थ नगर करमाळा, संतोष गायकवाड केतुर नं.१,राजेंद्र गायकवाड जेऊर ,वैभव जाधव शेलगाव वांगी ,व स्वप्नील खंडागळे वांगी नं.१ असे सात जण जुगार खेळताना वांगी न.१ येथील नवनाथ शिंदे यांच्या घरात आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी रोख ₹५२,५६० जप्त केले असून, विविध चारचाकी व दुचाकी वाहनांसह मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यात हिरो डिलक्स, हिरो पॅशन, बजाज प्लॅटिना, टीव्हीएस स्कुटी, अप्पे टमटम तसेच टाटा नेक्सॉन कारचा समावेश आहे. तसेच जुगारासाठी वापरले जाणारे टेबल, खुर्च्या, पत्त्यांचे डाव व इतर साहित्यही जप्त करण्यात आले.
पोलिसांनी एकूण ₹१०,२९,५६० किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून,क्लब सोमनाथ डावरे यांच्या मालकीचा आहे.संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सदर कारवाई पंचांसमक्ष करण्यात आली असून जप्त मुद्देमालावर पोलिसांनी सील लावले आहे.

