साडे जिल्हा परिषद शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

करमाळा: साडे येथील प्रगतशील बागायतदार संतोष मस्तुद यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन, बिस्किटे तसेच गुलाब पुष्प देऊन शालेय जीवनाच्या प्रारंभासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि शिक्षणाबद्दलची आवड वाढावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या आत्मविश्वासातही भर पडली आहे.

या कार्यक्रमातून शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, संस्कार आणि माणुसकी जपण्याचा संदेश देण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रवीण गोमे, योगेश गोमे, सूरज आमले, सूरज सुपे, स्वप्नील सुपे, ज्योतीराम कदम, ओंकार बारकुंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संतोष मस्तुद यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेरे सर यांनी केले, तर केंद्रप्रमुख वसंत बदर यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेतील शिक्षक व पालकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

