मोहरम उत्सवानिमित्त मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडकडून सामाजिक उपक्रम; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

करमाळा(प्रतिनिधी) :करमाळा शहर व तालुक्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम उत्सवानिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि समविचारी संघटनांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत हिंदू-मुस्लिम भाईचारा अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मोहरम उत्सवादरम्यान भाविकांसाठी अल्पोपहार व थंड सरबत वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच हजरत हसन-हुसेन यांच्या स्मरणार्थ उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व गरजू नागरिकांना फळवाटप करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मोहरम विसर्जनाच्या दिवशी छत्रपती चौक येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनांच्या वतीने विविध क्षेत्रांतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात येणार असून ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’च्या घोषणांनी सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोहरम उत्सव हा करमाळ्यातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असून, हे शहराचे वैशिष्ट्य असल्याचे सचिन काळे यांनी सांगितले. समाजात स्थैर्य, समानता आणि बंधुभाव टिकविण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच या उपक्रमांमुळे भावी पिढीला सामाजिक ऐक्याचा सकारात्मक संदेश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रा. नागेश माने, प्रा. संजय चौधरी, वरकटणेचे माजी सरपंच बापूसाहेब तनपुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, सतीश वीर, गणेश कुकडे, संतोष शितोळे, शरद जाधव, अजित कणसे, अशोक मचाले, दत्तात्रेय जाधव, अरुण टांगडे, बाळासाहेब झोळ, अतुल निर्मळ, सुहास पोळ, राज झिंजाडे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

