सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज करमाळा तहसीलसमोर घंटानाद आंदोलन -

सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज करमाळा तहसीलसमोर घंटानाद आंदोलन

0
संग्रहित छायाचित्र

करमाळा(दि.१९): शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सर्वपक्षीय शेतकरी संघटनांच्या वतीने आज (दि. १९ जून) सकाळी ११ वाजता करमाळा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी सरसकट कर्जमुक्ती” अशी घोषणा देत शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत.

आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ विमा भरपाई द्यावी व बोगस विमा कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येणार आहे.



याशिवाय करमाळा तालुक्यातील सीना नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊनही अद्याप मदत मिळालेली नसल्याने ती तातडीने वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना अद्याप मदत मिळालेली नसल्याचा आरोप करत संबंधितांना तात्काळ आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.



शेतकऱ्यांना शेती मशागत व पेरणीसाठी बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच मांगी तलावातील उचल पाणी जामखेड तालुक्याला देण्याचा आदेश रद्द करावा, अशाही मागण्या आंदोलनात मांडल्या जाणार आहेत.

या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयोजित घंटानाद आंदोलनात तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील निवडणुकीच्या काळामध्ये भाजप सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात आमचं सरकार आलं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. परंतु आत्ताची कर्जमाफी केली आहे ती शेतकऱ्यांची फसवणूक आहे. याचा गरीब शेतकऱ्यांना फायदा होत नाही. त्यामुळे हे आंदोलन करत आहोत. – अंगद देवकते, सोलापूर जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रीय समाज पक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!