उत्तरेश्वर मंदिरात मासिक शिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरात हिंदू नववर्षापासून दर महिन्याला शिवरात्री उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रविवार, दि. १२ जुलै रोजी बारवकर वस्तीच्या वतीने शिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला.

उत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक करण्यात आला. सायंकाळी ८ ते ११ या वेळेत ह.भ.प. दत्तात्रय ननवरे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांना गायनाचार्य ह.भ.प. सोमनाथ ढोले, मृदंगाचार्य उद्धव ननवरे महाराज तसेच रत्नाकर टोंपे यांनी सुरेल साथ दिली. कीर्तनादरम्यान पखवाजाची जुगलबंदीही भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
ह.भ.प. दत्तात्रय महाराज ननवरे यांनी, “नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी। ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पाया पडेल मिठी॥”
या अभंगावर अत्यंत प्रभावी निरूपण केले. त्यांच्या ओघवत्या वाणीतील कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

कीर्तनानंतर भगवान शंकराची आरती करण्यात आली. त्यानंतर बारवकर वस्तीच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या श्रद्धेने घेतला.
या शिवरात्री उत्सवासाठी केम, बारवकर वस्ती, घोटी, वडशिवणे आदी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण पद्धतीने संपन्न झाला.

